breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आमदाराची कार भररस्त्यात पार्क; सुमित राघवन म्हणतो, “शेवटी क्लास विकत घेता येत नाही”

मुंबईमधील दादर परिसरातील गजबजाटलेला भाग म्हणजे रानडे रोड. याच रानडे रोडवर काल एका आमदाराच्या मालकीची मर्सिडीज गाडी भर रस्त्यामध्ये पार्क केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. या गाडीचे फोटो आणि संबंधित प्रकार रात्रीपासूनच सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. अमोल परचुरे यांनी शेअर केलेली या गोंधळासंदर्भातील पोस्ट शेकडो लोकांनी शेअर केली. रस्त्याच्यामधोमध गाडी लावून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या आमदराच्या चालकावर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली. याच पोस्टवर ‘हॅमलेट’ फेम अभिनेता सुमित राघवन यानेही कमेंट करुन आपले मत व्यक्त केले. एवढ्या महागड्या गाडीच्या मागे ‘आमदार’चा स्टीकर लावल्यामुळे ‘मर्सिडीज’ने गाडी परत घ्यायला हवी, असे मजेशीर मत सुमितने नोंदवले आहे. तसेच ‘महागडी गाडी विकत घेता येते पण दर्जा विकत घेता येत नाही’, असा टोलाही सुमितने लगावला आहे.

दादर पश्चिमेकडील रानडे रोड येथे गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची मर्सिडीज गाडी डबल पार्किंग करुन उभी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक वाहनचालकांनी गाडीच्या चालकास गाडी पुढे घेण्याची विनंती केली असता त्यांने अगदी मग्रुरीमध्ये उत्तर दिले. ‘मॅडम शॉपिंगसाठी गेल्या आहेत,’ असं सांगत या चालकाने गाडी हलवण्यास नकार दिला. चालकाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने रानडे रोडवर वाहतूक कोंडी झाली. याचसंदर्भातील पोस्ट अमोल परचुरे यांनी फेसबुकवर शेअर केली.

व्हायरल झालेल्या या पोस्टवर अनेकांनी अती महत्वाच्या लोकांसाठी नियम वेगळे असतात का इथपासून ते चालकाला माज असल्यापर्यंत अनेक प्रकारची मते नोंदवली. याच मतांमध्ये अभिनेता सुमितनेही मत नोंदवले आहे. सुमित आपल्या कमेन्टमध्ये म्हणतो, “मर्सिडीज एम क्लास विकत घेता येते पण शेवटी क्लास (दर्जा) विकत घेता येत नाही. तो मुळातच असावा लागतो. एवढ्या महागड्या गाडीच्या मागे ‘आमदार’चा स्टिकर लावल्यामुळे ‘मर्सिडीज’ने गाडी परत घ्यायला हवी. बट ऑन सिरीयस नोट, चालकाला सुध्दा केवढा माज मग मालकाला किती असेल विचारायला नको.” ही कमेन्ट केल्यानंतर ही गाडी एम क्लास नसून जीएल सिरीजमधील असल्याचे लक्षात आल्याचे सुमितने दुसरी कमेंट करुन सांगितले. ‘एवढ्या महागड्या गाड्या कशा काय असतात ह्यांच्याकडे?’ असा प्रश्न मला पडतो असं सुमितने तिसऱ्या कमेंटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी केली कारवाई

पदपथांवर फेरीवाले आणि दुकानदारांनी केलेला कब्जा आणि त्यात भर म्हणजे रस्त्याच्या मधोमध पार्क केलेली कार यामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली. अखेर पंधरा मिनिटांनी पोलिसांनी या गाडीची दखल घेतली. गाडीचा चालक रफिक अहमद खान यांच्याकडून पोलिसांनी ४०० रुपयांचा दंड आकारला. दादर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी राजेंद्र तोंगरे यांनी ही कारवाई केली. मोठ्या आकाराची गाडी रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीपणे उभी करुन वाहतूक कोंडीस कारणभूत ठरल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला. हा संपूर्ण प्रकार जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे सुरु राहिला. तोंगरे यांनी गाडी बाजूला घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही गाडी बाजूला घेऊन वाहतूक कोंडी सुटली आणि सामान्य वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र पोलिसांनी चक्क आमदाराच्या गाडीवर कारवाई केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. या वाहतूक कोंडीत अनेकांनी या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button