तर उद्या गुटखा माफिया जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, धनंजय मुंडे यांचा इशारा
- धमकी देऊन सोडवलेल्या त्या गुटख्याच्या गाडीवर कोणती कारवाई केली ?
- कारवाई होत नसल्याने माफियांची पोलिसांना धमकी देण्यापर्यंत मजल
मुंबई – राज्यात बंदी असतांनाही खुलेआम गुटख्याची विक्री, उत्पादन केले जात आहे. गुजरात सह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणला जात आहे. मी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे मात्र सरकार कारवाई करीत नसल्यानेच पोलिसांना धमकी देण्यापर्यंत या माफियांची मजल गेली आहे. उद्या हे माफिया एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलीसांना दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रश्नाच्या मुळाकडे लक्ष वेधले आहे.
गुटखा बंदीबाबत आपण मार्च अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तेंव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचारी यांना धमकी देण्यातआली.आता गुटखा गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत उद्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत. मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यावर काही कारवाई करणार आहेत का नाही असा सवाल ही मुंडे यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांना गाडी सोडण्यासाठी धमकी देणे हे प्रकरण गाडी सोडण्यापूरते मर्यादित नाही तर त्या मागे राज्यातील गुटखा माफियांची शक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या गाजत असलेल्या त्या क्लिप मध्ये उल्लेख केलेली गुटख्याची गाडी सोडली का त्या वर काय कारवाई केली ? सदर गाडी मालकाच्या आणखी किती गाड्या आहेत, पोलिसांना धमकी दिल्याबद्दल काय कारवाई केली का दबावाखाली प्रकरण मिटवले असे अनेक प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केले आहेत.तामिळनाडू राज्यात गुटख्याबाबत ईडी च्या मदतीने छापे टाकले, सीबीआयने कारवाई केली राज्य सरकार ही तशी कारवाई करणार का प्रकरण दडपणार असे प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केले आहेत.