breaking-newsक्रिडा

तब्येत बिघडल्यामुळे एशियाडमध्ये पदकाला मुकावं लागलं – दत्तू भोकनळ

२०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये नौकानयन (रोविंग) प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळचं पदक अवघ्या ६ सेकंदाच्या फरकाने गेलं होतं. यानंतर इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्येही दत्तुकडून सर्वांना पदकाची आशा होती. दत्तूने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करुन सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैय्यक्तिक प्रकारात पदकाने दिलेली हुलकावणी त्याला अजुनही बोचत आहे. पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दत्तू भोकनळला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र अंतिम फेरीदरम्यान आलेल्या तापामुळे आपल्याला हवातसा खेळ करता आला नसल्याचं दत्तूने स्पष्ट केलं आहे, तो पीटीआयशी बोलत होता.

“इंडोनेशियात गेल्यानंतर मला नेमका स्पर्धेदरम्यान ताप आला. मला वाटलं वातावरणातील बदलामुळे असं झालं असावं म्हणून मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र अंतिम शर्यतीच्या वेळी मला थकवा जाणवायला लागला. पाणी माझ्या डोळ्यात आणि नाकात गेल्यामुळे माझा वेगही कमी झाला आणि हक्काचं सुवर्णपदक मी गमावून बसलो.” कोलकाता रोविंग क्लबतर्फे दत्तूचा सन्मान करण्यात आला, यावेळी तो पत्रकारांशी बोलत होता. मात्र या पराभवानंतरही आपल्या सहकाऱ्यांनी धीर देत आपण सांघिक सुवर्णपदक मिळवू शकतो असा विश्वास मला दिला, याच विश्वासाच्या जोरावर मी एक दिवस पूर्णपणे विश्रांती करुन स्पर्धेसाठी उतरलो आणि भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिल्याचं दत्तू म्हणला.

स्वर्ण सिंह, ओमप्रकाश, सुखमित सिंह या साथीदारांच्या सोबतीने दत्तूने सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धेआधी भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक व भारतीय प्रशिक्षक यांच्यात झालेला वाद चांगलाच रंगला होता. यावर प्रश्न विचारला असता दत्तूने थेट भाष्य करणं टाळलं. मी दोन्ही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडलो असल्यामुळे माझ्यासाठी दोघांचाही सल्ला तितकाच महत्वाचा असल्याचं दत्तू म्हणाला. यानंतर २०२० साली टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून देण्याचा दत्तूचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button