breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सहा समित्या कार्यरत

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभाग, विद्यापीठ, महाविद्यालय अशा विविध स्तरांवर सहा समित्या कार्यरत आहेत.

प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या  समितीमध्ये डॉ. चंदनवाले यांचाही समावेश आहे. मंगळवारी स्थापन झालेल्या या समितीस पाच दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नायर रुग्णालयाच्या टोपीवाला महाविद्यालयात ही घटना घडली असल्याने पालिकेनेही अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार आणि चौकशीच्या अहवालानंतरच पालिकेकडून कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत आहे का याची दखल घेण्यासाठी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगानेही चौकशी सुरू केली आहे. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणानंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांवरील कामाचा ताण, हेवेदावे, जातीय भेदभाव असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या प्रश्नांचा मुळापासून अभ्यास करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थेने (आयएमए) सत्यशोधक समितीची स्थापना केली आहे.

डॉ. तडवी प्रकरणाचा तपासही या समितीकडून केला जाणार आहे. ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव, डॉ. रवी वानखेडेकर, नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. होझी कपाडिया, ‘आयएमए’चे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. सुहास पिंगळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

पहिली बैठक मंगळवारी?

महाविद्यालयीन स्तरावर तपास करण्यासाठी प्रथम रॅगिंगविरोधी समितीने या प्रकरणाचा तपास केला. या समितीने अहवाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला. या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीच्या निष्कर्षांनंतरच विद्यापीठाकडून कारवाई केली जाणार आहे. मात्र अद्याप या समितीची एकही बैठक झालेली नसून मंगळवारी पहिली बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘व्यवस्था सुधारण्यावर भर आवश्यक’

घटना घडली की त्याला तातडीने प्रत्युत्तर म्हणून प्रशासनासह सर्वच व्यवस्था जाग्या होतात. ती घटना घडू नये म्हणून मात्र प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष केले जाते हाच पायंडा पडलेला आहे. डॉ. पायल यांच्या प्रकरणामधूनही हे स्पष्ट होते. त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईंकांनी तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केला परंतु महाविद्यालयातील तक्रार निवारण समितीच योग्यरितीने कार्यरत नसल्याने हा प्रसंग ओढावला. त्यामुळे केवळ समित्या स्थापन करून तपास करण्यापेक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे जनआरोग्य अभियानाचे डॉ. अभिजीत मोरे यांनी अधोरेखित केले.

‘नायर’च्या अधिष्ठात्यांची बढती रोखा ; विरोधी पक्षांची मागणी

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद शुक्रवारी पालिका सभागृहात उमटले. डॉ. पायल यांच्या आत्महत्येला रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना निलंबित करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बढती रोखा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. रुग्णालय प्रशासनाविरोधात राजा यांनी केलेल्या निवेदनाला विरोधी पक्षातील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला.

पालिका प्रशासनाने नायरचे अधिष्ठाते डॉ. रमेश भारमल यांची पालिकेच्या मुख्य रुग्णालयांच्या संचालकपदी नेमणूक करण्याचे ठरवले आहे. नायर रुग्णालयातील अनेक दुर्घटनांसाठी अधिष्ठाता डॉ. भारमल यांचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजा यांनी केला. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, भाजपचे अभिजीत सामंत यांनीही याला दुजोरा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button