breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ठाण्याच्या ‘अ बास्टर्ड पैट्रिऑट’ आणि मुंबईच्या ‘ब्रह्मास्त्र’ला मानाचा पारंगत एकांकिका सन्मान

एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित मोरया इव्हेंटस् अँड एंटरटेनमेंट सहआयोजित ‘आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान -२०२०’ मध्ये ‘अ बास्टर्ड पैट्रिऑट’ (दिशा थिएटर/ओंकार प्रॉडक्शन ,ठाणे) या एकांकिकेने खुल्या गटात तर मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालय च्या ‘ब्रह्मास्त्र’ या एकांकिकेने आंतरमहाविद्यालयीन गटात पारंगत ठरण्याचा मान मिळवला.

रंगयात्रा, इचलकरंजीच्या ‘मोठा पाऊस आला आणि…’ आणि मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेला अनुक्रमे विशेष परीक्षक सन्मान आणि लक्षवेधी नैपुण्य या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ‘अ बास्टर्ड पैट्रिऑट’साठी संकेत पाटील/राजरत्न भोजने तर ‘ब्रह्मास्त्र’साठी रोहित मोहिते/रोहित कोतेकर पारंगत दिग्दर्शक ठरले. गायन समाज देवल क्लब, कोल्हापूरच्या ‘इट हॅपन्स’ या एकांकिकेसाठी अनुपम दाभाडे याला पारंगत दिग्दर्शक म्हणून खुल्या गटासाठी विशेष परीक्षक तसेच ‘भोकरवाडीचा शड्डू’ एकांकिकेसाठी महाविद्यालय गटात ज्ञानसाधना,ठाणेच्या अजय पाटील याला पारंगत दिग्दर्शक मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्षभरातल्या एकांकिकांमधील सर्वोत्तमतेची पोचपावती देणारा ‘पारंगत सन्मान-२०१९’ पुरस्कार सोहळा रविवारी पु. ल. देशपांडे कला अकादमीत झाला. एकांकिका क्षेत्रातल्या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा या हेतूने या पारंगत सन्मान संध्येचे आयोजन केले जाते. यंदा खुल्या आणि आंतरमहाविद्यालयीन दोन्ही गटात वर्षभर वेगवेगळ्या प्रयोगशील एकांकिका झाल्यामुळे पारंगत सन्मानासाठी विशेष चुरस दिसून आली. त्याचे प्रतिबिंब निकालातही पडलेले दिसले.
खुल्या गटात ‘इट हॅपन्स’ मधल्या भूमिकेसाठी प्रमोद पुजारी आणि महाविद्यालयीन गटात कीर्ती महाविद्यालय, मुंबईच्या ‘ठसका’साठी धीरज कांबळे पारंगत अभिनेता ठरले. महाविद्यालयीन गटात “ब्रह्मास्त्र”साठी रोहन सुर्वेला लक्षवेधी अभिनय नैपुण्य आणि “भाग धन्नो भाग”साठी सागर शिंदेला अभिनयाचे मानपत्र देण्यात आले. खुल्या गटात अभिनयासाठी “अ बास्टर्ड पैट्रिऑट”साठी राजरत्न भोजनेला विशेष परीक्षक सन्मान मिळाला,तर समर्थ अकादमी,पुणेच्या “आर यू ब्लाइंड” साठी प्रणव जोशीला विशेष नैपुण्य तसेच विक्रम पाटील आणि कलांश थिएटर,रत्नागिरीच्या ‘बिराड’ या एकांकिकेसाठी महेश कापरेकरला अभिनय मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिराफ थिएटर्स,मुंबईच्या “सुंदरी” या एकांकिकेतल्या भाग्या नायरने खुल्या गटात तर महर्षी दयानंद महविद्यालय,मुंबईच्या “अर्धविराम” एकांकिकेतल्या निकिता झेपलेने आणि “भाग धन्नो भाग” एकांकिकेतल्या ऐश्वर्या मिसाळने संयुक्तपणे महाविद्यालयीन गटात पारंगत अभिनेत्री सन्मानावर नाव कोरले. वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ,महाविद्यालयीन गटात “ब्रह्मास्त्र”च्या कोमल वंजारेला आणि खुल्या गटात “अ बास्टर्ड पैट्रिऑट” मधल्या सिमरन सैद आणि “मोठा पाऊस आला आणि…” एकांकिकेतल्या कादंबरी माळीला विशेष मानपत्र देण्यात आले. विषयाच्या नावीन्याबद्दल ‘आर यू ब्लाइंड’साठी विशाल कदम तर ‘ठसका’साठी चैतन्य सरदेशपांडे पारंगत लेखक ठरले. लेखनासाठी खुल्या गटात ‘फ्लॅमिंगो’ करता तृप्ती झेमसे आणि ‘इट हॅपन्स’ साठी सुदर्शन खोत यांना मानपत्र देण्यात आले. ‘सुंदरी’ या एकांकिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजनेसाठी श्याम चव्हाण पारंगत प्रकाशयोजनाकार तर समर्पक नेपथ्य रचनेसाठी ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेकरता केतन दुधवडकर पारंगत नेपथ्यकार ठरला. तर ‘ब्रह्मास्त्र’ साठीच शुभम/तन्मय/गुरुप्रसाद पारंगत संगीतकार ठरले. ‘ब्रह्मास्त्र’साठी समीर सावंत पारंगत – प्रकाशयोजनाकार (मानपत्र),’अ बास्टर्ड पैट्रिऑट’साठी तनया कामटे / सागर पेंढारी आणि ‘सुंदरी’साठी समीर तोंडवळकर – पारंगत नेपथ्यकार (मानपत्र) आणि Gaff Monte साठी अभिषेक पाटील याला पारंगत संगीत (मानपत्र) देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अस्तित्व’तर्फे हा सोहळा मुंबई, ठाण्यातल्या विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. नामांकन घोषणा,पुरस्कार वितरणाबरोबरच सादर होणारी प्रहसन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.यात हसतखेळत वर्षभराचा आढावा घेतला घेतला गेला..एकांकिका क्षेत्रातले आजी-माजी सर्वच रंगकर्मीं यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button