breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आझाद मैदानातील गोळीबारामुळे तरुणाचा डोळा निकामी

पोलिसांच्या परवानगीविना खासगी संस्थेचे शिबिर; एअरगनच्या छऱ्यामुळे अपघात

आझाद मैदानात एअरगनने गोळीबाराचा सराव सुरू असताना त्यातील एक छर्रा लागून पादचारी तरुणाचा डोळा निकामी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील खासगी संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आझाद मैदानासारख्या वर्दळीच्या परिसरात गोळीबाराचा सराव करण्यापूर्वी पोलिसांची परवानगीही घेण्यात आली नव्हती, असे उघड झाले आहे.

मोहन चौगुले (२६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. खासगी शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करणारे चौगुले १६ फेब्रुवारीला आझाद मैदानातून जात असताना अचानक त्यांच्या डोळ्यात काही तरी घुसले. प्रचंड वेदना होऊ लागल्यामुळे ते तिथेच बसले. अन्य पादचाऱ्यांनी त्यांना सावरले, मात्र तोवर त्यांच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. हा प्रकार घडला, त्या शेजारी एअर गनने गोळीबाराचा सराव सुरू असून तिथूनच आलेला एक छरा त्याच्या डोळ्यात घुसल्याचा अंदाज पादचाऱ्यांनी वर्तवला. पादचाऱ्यांनी गोळीबाराचे प्रशिक्षण देणारे भीमराणा काळबांडे यांना बोलावून घेतले आणि चौगुले यांच्यासोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात येण्यास बजावले.

सेंट जॉर्ज येथून चौगुले यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोळ्यात घुसलेला छर्रा रुग्णालयात काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी चौकशी सुरू केली. हे प्रशिक्षण पुण्याच्या इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटरमार्फत निर्मला निकेतनच्या विद्यार्थिनींना देण्यात येत होते. प्रशिक्षण, सरावासाठी संस्थेने एअर गनचा वापर केला होता. लक्ष्यामागे काही पावलांवर प्लास्टिकचे आच्छादन उभारण्यात आले होते.

प्रशिक्षण, सरावातील छर्रा आच्छादनामुळे बाहेर जाऊ नये, अपघात होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. मात्र ही व्यवस्था पुरेशी नव्हती. यात संस्थेचा निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्याने गुन्हा नोंदवल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

सर्वसाधारणपणे अपघाताची शक्यता असलेली अशी शिबिरे मोकळ्या जागेत घेतली जात नाहीत. घेण्यात आली तरी तात्पुरत्या स्वरूपात छर्रे बाहेर पडू नयेत, पादचारी जखमी होऊ नयेत यासाठीची खबरदारी घेणे बंधनकारक असते.

या प्रशिक्षण, सराव शिबिराबाबत संस्थेने किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेने पोलीस ठाण्याला कळवले नव्हते. त्यामुळे या शिबिराबाबत कल्पना असणे शक्य नव्हते. अपघात घडल्यानंतर त्याबाबतची माहिती मिळाली, अशी माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली. परवानगीबाबत विचारले असता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, एअरगनचा समावेश असलेल्या शिबिरांना परवानगीची आवश्यकता नसते. जत्रा, मेळ्यांमध्ये अशाच गनने फुगे फोडण्याचे खेळ सर्रासपणे होतात. मात्र सुरक्षेची जबाबदारी असे खेळ, शिबिरांचे आयोजित करणाऱ्यांवर असते.

पोलिसांनी घटनास्थळावरून आणि चौगुले यांच्या डोळ्यातून काढलेला छर्रा, एअर गन पुढील तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोग शाळेत पाठवला आहे. हा छर्रा नऊपैकी कोणत्या विद्यार्थिनीने झाडला हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. संरक्षक पडदा भेदून छर्रा बाहेर पडला आणि चौगुलेंना लागला, असा अंदाज पोलीस वर्तवतात.

तरुणासमोर भविष्याचा प्रश्न

छर्रा लागल्याने मोहनच्या डोळ्याच्या पडद्याला इजा झाली. सात ते आठ मिलिमीटर लांबीचा छरा घुसल्याने डोळ्याचा पडदा फाटला. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पडद्यावर टाके घालण्यात आले. सध्या मोहनला जवळच्या वस्तूंचा आकार ओळखणे शक्य होत आहे. पडदा पूर्ववत होण्यासाठी दुसऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असून यासाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचे मोहनच्या कुटुंबीयांनी सांगितले. अपघातामुळे मोहन कामावर नाही. पुढील शस्त्रक्रियेसाठी आर्थिक जमवाजमव सुरू आहे. शस्त्रक्रियेनंतरही त्याची दृष्टी परत येईल याबाबत शाश्वती नाही. दृष्टी गेली तर लग्नापासून पुढील आयुष्याचा मार्ग खडतर होईल, अशी भीती चौगुले कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button