breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतही लसीकरणाला सुरुवात

मुंबई – देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. जगातील सर्वांत मोठे लसीकरण भारतात होणार आहे. पहिल्या टप्प्या फ्रंट लाईन वर्कर्सना लस टोचण्यात येणार आहे. त्यानुसार, देशातील सर्व राज्यांतही लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आदी ठिकाणीही मोठ्या उत्साहात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

रायगड

रायगडमध्ये कोरोनावरील लसीकरण मोहिमेला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली आहे. रायगडमध्ये पहिल्‍या टप्‍प्‍यातील लसीकरणासाठी 9500 डोसेस उपलब्‍ध आहेत. जिल्‍हयात अलिबाग, पेण, पनवेल आणि कामोठे अशा चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, नगराध्‍यक्ष प्रशांत नाईक, जिल्‍हाधिकारी निधी चौधरी, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा योगिता पारधी यांच्‍यासह आरोग्‍य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी

लसीकरण मोहिमेला रत्नागिरीमध्ये पाच आरोग्य केंद्रांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सई धुरी यांनी जिल्ह्यात सर्वात आधी लस टोचून घेतली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 500 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्याला 16 हजार 360 डोस पुरवण्यात आले आहेत. 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे.

नवी मुंबई

कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी भाजप नेते संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार हे उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका वाशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, अपोलो रुग्णालय येथे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात आज 100 जणांना लस दिली जात आहे. आज एकूण 400 जणांना लस दिली जाणार आहे. महापलिकेत कोरोनाच्या 21 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. तर कोविड अॅपवर 21 हजार 80 आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 400 जणांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

ठाणे

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आज कोरोनावरील लसीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील 23 केंद्रांमध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 62 हजार आरोग्य कर्मचारी आहेत, त्या सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचे कैलास पवार यांनी यावेळी सांगितले.

वसई-विरार

वसई-विरार महापालिकेतील इंडस्ट्रीयल लसीकरण केंद्रात आजपासून कोव्हिड लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बोईसरचे आमदार राजेश पाटील, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, पालिका आयुक्त गंगाधरण डी. यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाच्या 100 लाभार्थ्याना कोव्हिडची लस देण्यात येणार आहे.

मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकूण लसीचे 8 हजार 200 डोसेस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिका अंतर्गत जम्बो कोविड केयर सेंटर, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आणि वोकहार्ड रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या तिन्ही ठिकाणी 300 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 6308 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालिकेत लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. आजपासून लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button