breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘ठाकरे’ चित्रपटावरून सेना-मनसे वाद; निर्माते राऊत विरुद्ध दिग्दर्शक पानसे

मुंबई : ‘ठाकरे’ चित्रपटाच्या विशेष खेळादरम्यान बसण्यास आसन न मिळाल्याने अध्र्यावरून निघून गेलेले चित्रपटाचे दिग्दर्शक-मनसे नेते अभिजित पानसे आणि निर्माते व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात वाद उफाळला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पेटलेल्या या वादाने राजकीय वळण घेतले आहे.

या चित्रपटाच्या बुधवारी रात्री झालेल्या विशेष खेळास पानसे सपत्निक आले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना बसण्यास आसन मिळाले नाही. त्यामुळे ते संतापून निघून गेले. जाताना त्यांचा राऊत यांच्याशी वादही झाला. त्यानंतर पानसे यांनी राऊत यांच्यावर टीका केल्याने राऊत यांनी त्यास प्रत्युत्तर देत ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साठला की संयम आणि कृतज्ञता यांचे मोल नष्ट होते,’ असे ट्वीट केले. या चित्रपटाच्या   ‘प्रमोशन’मधूनही पानसे यांना डावलण्यात आल्याने धुसफूस सुरू होती आणि विशेष खेळादरम्यान त्याचे रूपांतर जाहीर वादात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचे जोरदार पडसाद समाजमाध्यमांवर उमटले असून मनसेने समाजमाध्यमांवरून राऊत यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे दिसत आहे. ‘आय सपोर्ट अभिजित पानसे’ असा हॅशटॅग फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागला असून शिवसेनेने पानसे यांना कसे डावलले, मनसेने त्यांना आपलेसे केले आदी जुन्या बाबींनाही या वादाच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे.

या वादाचे समाजमाध्यमांत जोरदार पडसाद उमटले आहेत. पानसे यांचे समर्थन करताना ‘ही तर त्यांची संस्कृतीच आहे’, असे ट्वीट काहींनी केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यासंदर्भात फलक लावले आहेत. मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटास मनसे शुभेच्छा अशा मजकुराचे फलक दादर परिसरात झळकले आहेत.

मनसेने दादरमध्ये लावलेल्या फलकांवर चित्रपट निर्माते संजय राऊत यांचा उल्लेख टाळला असून पानसे यांच्या अपमानाचे उट्टे काढले, अशी चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट आज २५ जानेवारीला मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button