breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांची निवडणुकीत ‘कीप अमेरिका ग्रेट’ची घोषणा

२०२० मधील अध्यक्षपदासाठी प्रचाराला प्रारंभ

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला. मंगळवारी फ्लोरिडा येथे त्यांच्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी झाली होती. या पूर्वी ‘मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन’अशी घोषणा देणाऱ्या ट्रम्प यांनी आता ‘कीप अमेरिका ग्रेट’ अशी नवी घोषणा दिली आहे.

ट्रम्प (वय ७३) हे स्थावर मालमत्ता गुंतवणूकदार होते ते नंतर राजकारणात आले. २०१७ मध्ये ते अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष झाले. त्यांनी ओरलँडो येथे सभेत वीस हजार लोकांपुढे असे सांगितले की, आपल्या नेतृत्वाखाली अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असून आता जगाला त्याचा मत्सर वाटत आहे. तीन वर्षांपूर्वी आपला जो विजय झाला तो अमेरिकी इतिहासातील निर्णायक क्षण होता.  त्यावेळी त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला होता. २०१६ मध्ये त्यांनी प्रचारावेळी जी आश्वासने दिली होती त्याच मार्गाने निर्णय घेतले त्यात त्यांनी कठोर स्थलांतर धोरण लागू केले. संरक्षणाचा खर्चही वाढवला. आपल्या कारकीर्दीत अमेरिकेने लक्षणीय प्रगती केली असून जर पुढील निवडणुकीत पराभव झाला तर अमेरिकेची प्रगतीच धोक्यात येईल.

कीप अमेरिका ग्रेट असा नारा देताना त्यांनी ७९ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, पुढील निवडणूक आपणच जिंकणार आहोत. २०१६ च्या प्रचारात त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा दिली होती. ओरलँडोच्या अ‍ॅमवे सेंटर येथे प्रचार सभा झाली त्यावेळी ट्रम्प यांनी सांगितले की, आपण आता पुढेच चालत राहणार आहोत. जिंकतच जाणार आहोत.

ट्रम्प यांच्या विरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात किमान डझनाहून अधिक दावेदार आहेत. पुढील वर्षांच्या सुरुवातीला प्राथमिक फेरीत डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार निश्चित होईल.

ट्रम्प यांच्या प्रचार शुभारंभावेळी उपाध्यक्ष माइक पेन्स व ट्रम्प यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.  माजी प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी लोकांना उद्देशून चार शब्द बोलावेत असे आवाहन ट्रम्प यांनी केले. सँडर्स यांनी अ‍ॅरिझोनातून गव्हर्नरपदाची निवडणूक लढवावी असा ट्रम्प यांचा आग्रह आहे.

डेमोक्रॅटिक पक्ष देशाला मागे घेऊन जाऊ पाहतो. आम्ही पुढे घेऊन जाऊ मागे पाहणार नाही असा विश्वास ट्रम्प यांनी लोकांना दिला. अफूवर आधारित व्यसनांचा बिमोड करण्यात प्रगती केली असून रोगांवरील औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. २०१६ मध्ये मतदारांनी सत्ता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे नव्हे तर एका पक्षाकडून जनतेकडे दिली असे त्यांनी म्हटले होते. देशाच्या विकासाआड येणारी दलदल काढण्याचे काम आम्ही करीत आहोत असेही ते मंगळवारी सभेत म्हणाले.

आणखी चार वर्षे हवीत

ट्रम्प यांच्या चाहत्यांनी आणखी चार वर्षे अशा घोषणा दिल्या. अपूर्ण राहिलेला कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ट्रम्प यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.  गेल्या अडीच वर्षांत आम्ही जेवढे काम केले तेवढे कुणीही केले नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. डेमोक्रॅटस व माध्यमे आमची अविश्वसनीय अशी चळवळ मोडून काढण्यासाठी सूडाने प्रयत्न करीत आहेत असा आरोप  त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button