breaking-newsताज्या घडामोडीपुणे

टेनिसबॉलमधून गांजा पोहचविण्याचा प्रयत्न ; पुण्यातील तिघे अटक

कोल्हापूर : टेनिसबॉलमधून कळंबा कारागृहात गांजा पोहचविण्याचा तिघांचा प्रयत्न जुना राजवाडा पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील तीन तरुणांना अटक केली असून, वैभव विवेक कोठारी (वय २४, रा. के.पी.नगर पुणे, सध्या रा. सदरबाजार), संदेश नितीन देशमुख (वय २०) आणि अमित सुनील पायगुडे (वय २५, दोघे रा. बिबेवाडी, पुणे) अशी त्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी संशयितांकडून तीन बॉलमध्ये लपविलेला १५ ग्रॅम गांजा जप्त केला.  

जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी संदीप बेंद्रे यांना कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ तीन तरुण क्रिकेट खेळत आहेत, त्या तिघांकडे तीन टेनिसबॉल असल्याची माहिती मिळाली. क्रिकेट खेळणाऱ्या तिघांकडे एकऐवजी तीन टेनिसबॉल कसे? कारागृहाच्या भिंतीजवळ ते क्रिकेट का खेळत असावेत, अशी शंका  बेंद्रे यांना आली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाने दुपारी येथे सापळा रचून कारवाईस सुरुवात केली. 

कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीच्या परिसरात दुपारी तीन तरुण उभे होते. त्या तिघांकडे टेनिसबॉल होते. पथकाने त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील टेनिसबॉल जप्त केले. हे  बॉल कापून त्यात गांजा भरून हे चेंडू पुन्हा चिकटपट्टीने चिकटविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ते तिघे पुण्याचे असून, त्याची नावे वैभव कोठारी, संदेश देशमुख, अमित पायगुडे असल्याचे माहिती मिळाली. तिघेही संशयित आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात आले.

ते दुपारी कळंबा कारागृहात असणाऱ्या मित्राच्या भावाला भेटण्याच्या निमित्ताने गेले होते. येथे ते गांजा भरलेले टेनिसचे बॉल भिंतीवरून कळंबा कारागृहात पोहचविण्याच्या प्रयत्नात होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. त्या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून बॉलमध्ये असणारा सुमारे १५ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, उपनिरीक्षक योगेश पाटील, कर्मचारी संदीप बेंद्रे, शाहू तळेकर, प्रदीप पाटील, अनिल ढवळे, रमेश डोईफोडे यांनी ही कारवाई केली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button