breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“टीस”ची नियुक्ती हीच धनगर समाजाची फसवणूक – धनंजय मुंडे

बीड : –  “धनगर” की “धगनड” हे बघण्यासाठी टीस कशाला पाहिजे?  टीसला संवैधानिक आधारच नाही.  उद्या टीसनं सांगितलं की धनगरांना आरक्षण द्या, तर ते राज्य सरकारने, केंद्र सरकारने पाळलं पाहिजे याचं काही बंधन नाही. धनगर समाजाचं मागासलेपण इतर राज्यात जे आहे तेच महाराष्ट्रात आहे.  ते पाहण्याचं काम टीसकडे देणं हीच धनगर समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक आहे, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली.
बीड येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, धनगर समाज कर्मचारी महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला महासंघ यांच्यावतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये मी खांद्याला खांदा लावून उभा आहे. माझं लहाणपण परळीमध्ये धनगराच्या वाड्यात गेल्यामुळे धनगर समाजाच्या अडचणी मला माहित आहेत. जे नातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व परळीचं आहे, तेच नातं माझं आणि धनगर समाजाचं, आरक्षणाचं आहे. मला माहित नाही जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळेल की नाही. आरक्षणाची जान नसलेल्या महादेव जानकरांना आता जाग आली असून, ते म्हणतात टीसचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही त्यामुळे टीसचा अहवाल आल्यानंतरच आरक्षणाबाबत निर्णय होणार आहे. आता जे काही बोलतायेत ते दिशाभूल करायेत. माझं सरकारला आवाहन आहे की, उद्या टीसनं सांगितलं आरक्षण दिलं पाहिजे तर सरकार आरक्षण देईल हा शब्द सरकारनं द्यावा.
सरकारवर कोरडे ओढताना धनंजय मुंडे म्हणाले, किती दिवस तुम्ही मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाची फसवणूक करणार? धनगर समाजाने आरक्षणासाठी बारामतीला आंदोलन केलं. तिथे त्यावेळच्या भाजपच्या अध्यक्षांनी शब्द दिला की पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो. आता तेच मुख्यमंत्री आहेत व कॅबिनेटमध्ये कोणता विषय आणायचा हे जर त्यांच्या कार्यालयातून ठरत असेल तर त्यांनी दिलेला शब्द अजून पुर्ण केला नाही ही आपली फसवणूक नाही का? मी त्या मुख्यमंत्र्यावर आरोप केला, देवेंद्र फडणवीस ऐवजी देवेंद्र फसवणीस म्हटलं तर राग येतो. पण त्यांचं आडनाव बदलायची वेळ ही त्यांच्या कर्तृत्वातून आली आहे. ते कोणाला आरक्षण देणारच नाहीत. त्यांची विचारधारा ही आरक्षण देण्याची नाही. उठावं आर.एस.एस. ने सांगावं आम्ही आरक्षणाचे पुरस्कर्ते आहोत. या देशात आरक्षण पाहिजे ही भूमिका मोहन भागवतांनी घ्यावी, पण ते घेवू शकत नाहीत. आपल्याला आरक्षण देतो म्हणणाऱ्यांचे आरक्षणाशी काहीच नाते नाही, असा दावा मुंडे यांनी केला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button