जालन्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, 7 नव्या रुग्णांची भर
जालना | जालन्यात आज पुन्हा सात नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 51 वर पोहोचली आहे. जिल्हा रुग्णालयाने बुधवारी जिल्ह्यातील एकूण 137 संशयीत रुग्णांचे लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याबाबतचा अहवाल काल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.
प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जुना जालना भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एका नामांकित खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी, नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयातील एक, भोकरदनमधील एक जवान आणि मंठा तालुक्यातील पेवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला एक जण असे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. यामुळे जालना जिल्ह्याने कोरोनाचे अर्धशतक पूर्ण केले असून कोरोनाचा जिल्ह्यावरील विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे.