breaking-newsमुंबई

जबाबदारी ढकलत मुंबईकरांच्या जीवाशी खेळ

  • अशोक चव्हाण : आजच्या दुर्घटनेमुळे पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले नसल्याचे स्पष्ट 

मुंबई – अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असणारे सरकार आणि मुंबई महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

एक वर्षापूर्वी एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने मुंबईच्या सर्व स्थानकावरील पादचारी पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, आजच्या दुर्घटनेमुळे पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या दुर्घटनेतून कोणताही धडा घेतला नाही. मुंबईकरांच्या जीविताबाबत सरकार किती असंवेदनशील आहे, हेच या दुर्घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

या दुर्घटनेची जबाबदारी पूर्णपणे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेची आहे. मात्र सरकार आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेत एकत्रितपणे बसून सत्तेचा लाभ घेणारे भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. कोसळलेला गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. तर दुसरीकडे गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप मुंबईच्या महापौरांनी केला आहे, असे चव्हाण म्हणाले.

मुंबई महापालिका या पुलाच्या देखभालीचा खर्च रेल्वेला वेळोवेळी देत आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र दिलेला निधी योग्य कारणासाठी खर्च होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. महापालिकेने ती जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही आणि रेल्वे ही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकण्याचा हीन प्रकार थांबवून मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी काम करावे. सरकारने या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button