जगभरात आतापर्यंत कोरोनाचे ७ लाख बळी
नवी दिल्ली – जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आतापर्यंत जगातील ७ लाख जणांचा बळी घेतला आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको या देशांमधील कोरोना बळींची संख्या जास्त आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज सरासरी ५ हजार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. म्हणजे तासाला २४५ जणांचा मृत्यू होत असल्याने दर १५ सेकंदाला कोरोनाने एकाचा मृत्यू होत आहे.
अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे या देशांमध्ये मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत ४९ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून १ लाख ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत ७ लाख ५ हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी ८७ लाख झाली आहे. जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त रुग्ण ब्राझीलमध्ये आहेत. ब्राझीलमध्ये २४ तासांत ५१ हजारपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले. तेथे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ लाखांच्या वर गेला आहे.