breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जगताप, लांडगे, पानसरे हे जिल्ह्याचा कारभार चिंचवडमधूनच चालवतात – गिरीश बापट

  • ते माझ्या कानात सांगतात आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगतो
  • पालकमंत्री गिरीश बापट यांचा चिमटा

 

पिंपरी – या भागाचे आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात की, पुणे जिल्ह्याचा कारभार पूर्वी चिंचवडमधून चालायचा, तो नंतर पुण्याकडे गेला. परंतु, आमचे लक्ष्मण “काका” असतील किंवा महेश “दादा” आणि पानसरे “साहेब” हे त्रिकूट आजही जिल्ह्याचा कारभार येथुनच चालवतात. फक्त ते माझ्या कानात सांगतात, आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगतो, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी तिघांना चिमटा काढत त्यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.

 

क्रांतीवीर चापेकर संग्रहालयाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) पार पडला. यावेळी सभेला संबोधीत करताना पालकमंत्री बापट आपल्या मिश्कील शैलीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पक्षनेता एकनाथ पवार, माजी महापौर आझम पानसरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर शैलजा मोरे, गटनेते कैलास बारणे, राहूल कलाटे आदी यावेळी उपस्थित होते.

 

आपल्या भाषणात बापट म्हणाले, गेल्या चाळीस-पन्नास वर्षामध्ये जी कामं पिंपरी-चिंचवडमध्ये झाली नाहीत. ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या पाच वर्षात केला आहे. लोकं केवळ एक-दोन कामं झाली नसल्याचं सांगतात. त्या एक-दोन कामांचा उल्लेख करताना झालेल्या दहा कामांचा उल्लेख करायला विसरू नका, अशा सूचनाही त्यांनी विरोधकांना व्यासपीठावरून केल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे खांब उभे राहिले. मेट्रो सुरू झाल्यानंतर “पहिल्या दिवशी फुकट नेऊ, दुस-या दिवसांपासून तिकीट घेऊ”, असा उल्लेख करत बापट यांनी नागरिकांना कानपिचक्या घेतल्या.

 

पवना बंद जलवाहिनीचा प्रश्नही चर्चेच्या माध्यमातून संपवत आणला आहे. कारण, तेथेही शेतक-यांना आम्ही न्याय देत आहोत. भामा आसखेडच्या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून सोडवत आहेत. पिंपरी-चिंचवडचा एकही प्रश्न प्रलंबित ठेवला नाही. शहराचे महापौर, आमदार, आमच्याकडे येत असतात. त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही सर्व प्रश्न सोडवत आहोत. आमची कोणतीही कामं आपल्याकडे पेंडींग नाहीत. जर असतील तर आमचे लांडगे साहेब आणि जगताप साहेब फाईलवर मुख्यमंत्र्यांच्या सह्या घेण्यास पटाईत आहेत, आशी खिल्लीही बापट यांनी भाषणाच्या शेवटी उडविली. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात शहराचा दोन भागात कचरा व्यवस्थापन, वेस्ट टू एनर्जी, आवास योजना आदी प्रकल्पांच्या निविदांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्याची झळ पालकमंत्री बापट यांना देखील सोसावी लागत आहे. त्यामुळे लांडगे आणि जगताप यांच्यातील धुमसते वातावरण कसे निवळता येईल, याचा बापट कसोशिने प्रयत्न करत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button