breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

छोटय़ांच्या श्रमदानातून उकिरडय़ावर बगीचा

मुंबई : रविवार उजाडला आणि छोटय़ा दोस्तांसह तरुण मंडळी फावडी, घमेली घेऊन श्रमदानासाठी घराबाहेर पडली. हा हा म्हणता उकिरडा साफ झाला आणि धारावीकरांच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या चौकीजवळ एक छोटेखानी बगीचा साकारला. ही सर्व किमया बच्चे कंपनीने घडवली. त्याला जोड मिळाली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची.

गेली अनेक वर्षे धारावीतील धोबीघाट परिसरातील एका भूखंडावर कचरा टाकण्यात येत होता. या जागी भटक्या कुत्र्यांचा वावर होता, घुशींचा सुळसुळाट झाला होता. एकूणच या जागेला उकिरडय़ाचे रूप आले होते. कायम नाकाला रुमाल लावून जावे लागे. यामुळे आसपासचे रहिवासी कमालीचे अस्वस्थ झाले होते. अधूनमधून येणारी पालिकेची गाडी कचरा उचलून नेत असे. मात्र, आसपास अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडय़ा आणि वाढलेली लोकवस्ती यामुळे वारंवार तेथे कचरा टाकला जात होता.धारावीतील आणि आसपासच्या परिसरातील सिद्धार्थ मेढे, एन. आर. पॉल, कृष्णा कामाची, जगन्नाथ भोसले आणि अन्य काही मंडळींनी एकत्र येऊन धारावी नागरिक सेवा समिती स्थापन केली. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणून एक पोलीस बीट चौकी बांधण्यात आली. चौकीलगतच्या भूखंडावर कचरा टाकला जात होता. भविष्यात पोलीस चौकीत उपस्थित पोलिसांच्या आरोग्याला कचऱ्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून श्रमदानातून तेथे साफसफाई करण्याचा संकल्प समितीने सोडला. अनेक वर्षांपासून साचलेल्या मातीचा ढिगाराही उपसायचा होता. मात्र श्रमदानाची घोषणा करताच रहिवासी मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच काही सुजाण रहिवाशांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली.

काहींनी सिमेंट, विटा, रेती दिली. आर्थिक मदत आणि साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर रविवारी बच्चे कंपनीच्या जोडीने तरुणांनी श्रमदानाला सुरुवात केली. साचलेला कचरा गोळा करण्यात आला.

त्यानंतर भूखंड सपाट करण्यात आला. गोळा झालेला कचरा पालिकेने उपलब्ध केलेल्या डम्परच्या साहाय्याने धारावीतून हलविण्यात आला. तसेच पालिकेच्या जेसीबीने भूखंडाला हळूहळू आकार देण्यात आला. या भूखंडाचे रूपडेच बदलून गेले.

धारावी नागरिक सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि रहिवाशांनी जमा केलेल्या वर्गणीतून वसई येथील रोपवाटिकेतूून काही निवडक झाडांची रोपे विकत आणण्यात आली. ही रोपे बालकांच्या स्वाधीन करण्यात आली. केवळ या भूखंडावरच नव्हे तर आसपासच्या परिसरातही मुलांनी वृक्षारोपण केले. केवळ वृक्षारोपण करून समिती थांबली नाही, तर रोपण करण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही मुलांवरच सोपविण्यात आली. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही छोटी मंडळी उत्साहाने पार पाडत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

धारावीमधील वातावरणात सुधारणा व्हावी या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन विभागातील विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांनी १९९७ मध्ये तेथे वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली होती. समितीने हीच मोहीम पुढे नेण्याचा संकल्प सोडत वृक्ष संवर्धन करणाऱ्या मुलांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. सुमारे १०० विद्यार्थ्यांना रोपे देण्यात आली असून त्यांनी या रोपांची लागवड केली आहे. रोपांची वाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button