ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाय घसरून भाऊ शेततळ्यात पडला, वाचवण्यासाठी बहिणीने मारली उडी

अहमदनगर| पाणी टंचाईच्या काळात उपयुक्त ठरणारी शेततळी जशी वाढत आहेत, तसेच त्याचे अपघातही वाढत आहेत. संगमनेर  तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावातील घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी अशीच एक घटना घडली. शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सख्या बहिण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. जयश्री बबन शिंदे (वय २१) व आयुष बबन शिंदे (वय ७) या दोघांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार आधी आयुष तळ्यात पडला असावा आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेली बहीण जयश्री देखील पाण्यात पडल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.

मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. रविवारी सकाळी त्यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला असावा. त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही शेततळ्यातील पाण्यात बुडाले असावेत.

बऱ्याच वेळानंतर ही घटना लक्षात आली. अपघाताची माहिती कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले पण त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टंचाईच्या काळातही पाण्याचे हक्काचे साधन म्हणून शेततळे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यासाठी सरकारी योजनाही असून त्यातून ठराविक अनुदानही दिले जाते. शेततळ्याची रचना कशी, असावी हेही ठरवून देण्यात आलेले आहे. पाणी जमिनीत मुरू नये, यासाठी त्याला विशिष्टय प्रकारचा प्लास्टीकचा कागद वापरला जातो. हा कागद निसरडा असतो. त्यामुळे त्याच्यावरून पाय घसरात. पाण्यात पडलेली व्यक्ती काठावर आली तरीही या कागदावरून वर चढता येत नाही. त्यासाठी वेगळे सुरक्षा उपाय करावे लागतात. मात्र, ते पुरेसे नाहीत. तळ्यांची संख्या वाढत असताना या उपयांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. तसेच शेततळ्यावर होणाऱ्या अपघातांसंबंधी जनजागृती आणि प्रशिक्षण होण्याची गरज आहे. मात्र, अपघात वाढून अनेकांचे बळी जात असले तरी अद्याप यावर गांभीर्याने विचार झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button