breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चादर, उशी आणि बेडशीट खरेदीबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालिकेची पाठराखण

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेली खरेदीच योग्य
  • आमदार जगतापांच्या प्रश्नाला मंत्री शिंदे यांचे उत्तर

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाच्या परिस्थितीत कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रांतील आवश्यकतेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाद्वारे चादर, उशी आणि बेडशीटची थेट पद्धतीने खरेदी करण्यात आली. यामध्ये ठेकेदाराला तिप्पट दर दिल्याने महापालिकेचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, याला उत्तर देताना नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाठराखण केली आहे. लॉकडाऊनमुळे व्यापारी व वाणिज्यिक आस्थापना बंद असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने चादर, उशी आणि बेडशीटची थेट पद्धतीने केलेली खरेदी ही बाजारातील दराची खातरजमा करूनच केल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांनुसार शहरात कोविड सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रे सुरू केली. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रांसाठी महापालिकेच्या भांडार विभागामार्फत तब्बल ८० लाख ६१ हजार किंमतीचे सोलापुरी चादर, उशी आणि बेडशीट थेट पद्धतीने खरेदी केले. प्रति सोलापुरी चादर ३७६ रुपये ९५ पैसे आणि प्रति बेडशीटसाठी ४२९ रुपये २० पैसे असा दर महापालिकेने मोजला. वास्तविक बाजारात सोलापुरी चादर ९० रुपयांपासून १३२ रुपयांपर्यंत आणि बेडशीट ७५ रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोलापुरी चादर आणि बेडशीट तिप्पट दराने थेट पद्धतीने खरेदी केले. त्यामुळे महापालिकेला सोलापुरी चादर आणि बेडशीट पुरविलेल्या ठेकेदाराला ६० लाख रुपये जादा द्यावे लागले की नाही ?, याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

बाजारात चादर, उशी, बेडशीट कमी रक्कमेत उपलब्ध असतानाही महापालिकेच्या भांडार विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून घाटकोपर येथील एका एजंटाला खरेदीची ऑर्डर दिली. वास्तविक अशा वस्तूंची महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करणे अपेक्षित असताना महापालिकेने तसे केले नाही. त्यामुळे महापालिकेचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनालाही लेखी निवेदन देऊन भांडार विभागाने थेट पद्धतीने केलेल्या खरेदीची दक्षता समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. या चौकशीत काय तथ्य आढळून आले आणि कोणती कारवाई केली ?, असा सवाल देखील आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारला अतारांकित प्रश्नाद्वारे विचारला होता.

बाजारातील दरांबाबत खातरजमा करूनच वस्तूंची खरेदी मंत्री शिंदे

आमदार जगताप यांच्या अतारांकित प्रश्नाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चादर, उशी आणि बेडशीट बाजारभावानुसारच खरेदी केल्याचे कळविले असल्याचे म्हटले आहे. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण कक्षासाठी चादर व बेडशीट यांची तातडीने आवश्यकता होती. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यापारी व वाणिज्यिक आस्थापना सर्वत्र बंद होत्या. राज्याचा उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय व खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या नियम पुस्तिकेमध्ये अनर्थकारक घटना, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगामुळे खरेदीविषयीची तातडीने गरज असते आणि खरेदीच्या अन्य कोणत्याही पद्धतीचा अवलंब करणे व्यवहार्य नसते अशावेळी एकलस्त्रोत पद्धतीने खरेदी करावी, अशी तरतूद आहे. त्याचा आधार घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालिन परिस्थितीत महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करावयाच्या वस्तूंसाठी ठरविलेल्या दरपत्रकानुसार प्रति नग ४२९.२० रुपये दराने दहा हजार बेडशीट्स आणि प्रति नग ३७६.७५ रुपये दराने दहा हजार सोलापुरी चादरी खरेदी केल्या आहेत. त्यापोटी ८० लाख ६१ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. महापालिकेने बाजारातील दरांबाबत खातरजमा करूनच या वस्तूंची खरेदी केल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. यातून शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाठराखण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button