breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

घरकुल घोटाळा: सुरेशदादा जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पूरता जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाने तीन महिन्यांसाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे. याचबरोबर त्यांना पाच लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये जळगाव सत्रन्यायालयाने याप्रकरणात एकूण ४८ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. एकूण २९ कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार होता. याप्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि काही नगरसेवकांचा आरोपींच्या यादीत समावेश आहे. काही दिवसांपासून सुरेशदादा जैन जेजे रुग्णालयात उपचार घेत असल्याची देखील माहिती होती. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना तीन महिन्यांचा तात्पूरता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

  • काय आहे घरकुल घोटाळा ?

घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.मात्र २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही. तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

दरम्यान याच काळात जळगाव नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देण्यात आली. या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांच्यासह एकूण ९० जणांचा समावेश आहे. यापैकी सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button