गौरी लंकेश हत्याप्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल
बंगळूर – कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्याप्रकरणी येथील न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता टी.नवीन कुमार याला आरोपी करण्यात आले आहे.
एसआयटीने दाखल केलेल्या 650 पानी आरोपपत्रात नवीन कुमारच्या हत्या प्रकरणातील सहभागावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आरोपपत्रात 131 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. तीव्र हिंदुत्वविरोधी विचारांबद्दल ओळखल्या जाणाऱ्या 55 वर्षीय लंकेश यांची मागील वर्षी 5 सप्टेंबरला त्यांच्या येथील घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली. त्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला. त्यानंतर चालू वर्षी 18 फेब्रुवारीला एसआयटीने अवैध शस्त्र आणि दारूगोळा बाळगल्याबद्दल नवीन कुमारला अटक केली.
नवीन कुमारच्या चौकशीनंतर एसआयटीने तो लंकेश हत्या प्रकरणात सामील असल्याचा पुरावा मिळाल्याचा दावा केला. त्यावरून त्याला लंकेश हत्या प्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी पाच जणांना याआधीच एसआयटीने अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातील अमोल काळे उर्फ भाईसाब या आरोपीचाही समावेश आहे.