breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का; भाजपाची तिसऱ्या जागेची खेळी यशस्वी होण्याची शक्यता

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वी राजकीय धक्के जाणवू लागले आहेत. काँग्रेसनं दोन उमेदवार उतरवले असून, भाजपानं तीन उमेदवार दिले आहेत. भाजपानं संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेची खेळी केली आहे. ती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानं राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या ८ वर गेली आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात तीन उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. निवडणुकीची नवी तारीख जाहीर झाल्यावर आणखी दोन आमदारांनी गुरुवारी राजीनामे सादर केले. राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या सात झाली होती. त्यानंतर आणखी काही आमदार राजीनामे देतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. भाजपाचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

शुक्रवारी काँग्रेसच्या आणखी एका आमदारानं राजीनामा दिला आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसच्या आठव्या आमदारानं राजीनामा दिला. गुजरात विधानसभेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ‘पीटीआय’नं हे वृत्त दिलं आहे.

दोन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते. त्यात आठ आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले. परिणामी काँग्रेसची दुसरी जागा निवडून येणे कठीण मानले जात आहे. आमदारांचे संख्याबळ घटल्याने एकूण मतदारांचे प्रमाण कमी होऊन उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचे प्रमाणही कमी झाले आहे. नव्या संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. कारण तीन उमेदवारांच्या विजयासाठी भाजपकडे आता पुरेशी मते उपलब्ध असणार आहेत. दोन वर्षांपूर्वी अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपने काँग्रेस आमदारांची फोडाफोडी केली होती; पण पटेल यांना निसटता विजय मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button