breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गाय महत्त्वाची की माणूस?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा प्रश्न

सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणूस हे ठरवावे लागेल, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी व्यक्त केली.

या देशातील सामान्य माणूस लोकशाहीचा संरक्षक आहे; परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट दिशेने वाहू लागते. आपला प्रवास असहिष्णुतेकडे, संकुचितपणाकडे, ठोकशाही आणि अराजकतेच्या दिशेने होऊ  लागतो. काहींच्या भावना पटकन दुखावतात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्तींविषयी चिकित्सक भाष्य केले की संबंधित गट संतप्त होतात. कायदा हाती घेऊन प्रसंगी हिंसाचार घडवतात, अशी व्यथा फादर दिब्रिटो यांनी व्यक्त केली.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १८व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो बोलत होते. नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे, संयोजक दिलीप बराटे आणि काका चव्हाण या वेळी उपस्थित होते.

दिब्रिटो म्हणाले, विचारांचे जागतिकीकरण आपल्या वेदांमध्ये आणि संत साहित्यामध्ये आहे. सहिष्णुता हा धर्म आणि असहिष्णुता हा अपघात आहे. राज्यघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत या देशातील प्रत्येक जण सुरक्षित आहे. साहित्यिक आणि कलावंतांनी स्वाभिमान विकायचा नसतो. सुदैवाने काही निर्भीड विचारवंत ‘राजा तू नग्न आहेस’, अशी स्पष्ट भूमिका घेत आहेत, ही आशादायक बाब आहे. सरकारी समितीवर वर्णी लावण्यासाठी किंवा सरकारी कोटय़ातून घर मिळविण्यासाठी जे रांगेत उभे आहेत त्यांच्याकडून अशा बाणेदारपणाची अपेक्षा करता येणार नाही, अशा शब्दांत दिब्रिटो यांनी काही साहित्यिकांच्या भूमिकेवर टीका केली.

विभूतिपूजा, कर्मठपणा आणि पोथिनिष्ठा वाढत असल्याने हाडाच्या संशोधकांची कुचंबणा आणि विचारवंतांचा कोंडमारा होतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनसत्रामुळे आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही फादर दिब्रिटो म्हणाले.

सत्ताधारी फारसे अनुकूल नसताना समलिंगी संबंधांना मान्यता देणारे आणि सरोगसीबाबतचे विधेयक आम्ही संमत करून घेतले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एका तरी तृतीयपंथी नागरिकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

साहित्याचा मुख्य प्रवाह असे म्हणताना बाकीचे गौण, दुय्यम आहे का, असा प्रश्न गज्वी यांनी उपस्थित केला. संमेलनातून कोणत्या प्रकारचे साहित्य निर्माण होते याचा विचार झाला पाहिजे. आपल्या संमेलनावर टीका करणारे आणि आपल्या साहित्याला मोठे करणारे समीक्षक निर्माण झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

फादर दिब्रिटो म्हणाले..

  • धर्मग्रंथ नाकारतो ते राज्यघटना आपल्याला देते हे शबरीमला प्रकरणात दिसले.
  • टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्या तेव्हा सामान्यांनी तिसरा डोळा उघडला. आताही लोक तिसरा डोळा उघडत आहेत.
  • काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत अशा गोष्टींपेक्षाही आपल्याला भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त भारत हे उद्दिष्ट गाठायचे आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button