breaking-newsराष्ट्रिय

गरबास्थळी गैरहिंदूंना प्रवेश न देण्याचे बजरंग दलाचे आवाहन

अहमदाबाद : नवरात्रीचा उत्सव हे हिंदू महिलांना आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचे व्यासपीठ झाले असल्याचा दावा करून, गुजरातमधील ‘गरबा’च्या ठिकाणी  गैरहिंदूंचा प्रवेश रोखावा, असे बजरंग दलाने गरबा नृत्याच्या आयोजकांना सांगितले आहे.

गरब्याच्या ठिकाणांच्या बाहेर सतत पहारा देण्यासाठी आणि लोकांना ‘लव्ह जिहाद’ बाबत सतर्क करणारी भित्तिपत्रके लावण्यासाठी या हिंदुत्ववादी संघटनेने पथकेही स्थापन केली आहेत. अहमदाबादमध्ये सर्व मोठय़ा गरबा कार्यक्रमस्थळी, विशेषत: मुस्लीमबहुल भागांजवळील स्थळी अशा प्रकारची पत्रके लावण्यात आली असल्याचे बजरंग दलाचे अहमदाबाद विभाग समन्वयक ज्वलित मेहता यांनी सोमवारी सांगितले.

नवरात्रीच्या काळात गैरहिंदू लोकांतर्फे हिंदू समाजातील मुली व महिलांना लक्ष्य करण्याच्या कारस्थानाबाबत या भित्तिपत्रकांच्या माध्यमातून आम्ही समाजाला खबरदार करत आहोत. दरवर्षी तीन लाखांहून अधिक हिंदू मुली/ महिला या ‘लव्ह जिहाद’च्या शिकार ठरतात, असा दावा मेहता यांनी केला. पालकांनी सतर्क राहून त्यांच्या मुलींना वाचवावे, असे आवाहनही या संघटनेने केले आहे.

गरबा कार्यक्रमस्थळी गैरहिंदूंचा प्रवेश रोखावा असे आम्ही यापूर्वीच गरब्याच्या आयोजकांना सांगितले आहे, असे मेहता म्हणाले. शहरातील मोठय़ा कार्यक्रमस्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी बजरंग दलाने पथकेही स्थापन केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button