breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार गिरीश बापट यांच्याकडून अजित पवारांवर टिका आणि कौतुकही

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून अजित दादांना काम करता आले नाही. वीस वर्षे सत्तेत राहून त्यांना जे जमले नाही. ते आम्ही पहिल्या सहा महिन्यात करून दाखविले. केलेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. परंतु, दादासारखा माणूस मुलाचं सोडून कोणाचंच कौतुक करत नाही. शेवटी दादांच्या मार्गदर्शक सूचनांचा आम्ही आदरच करतो, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका आणि कौतुकही केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सदस्यनोंदणी, तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज पिंपरीतील एका हॉटेलमध्ये नगरसेवक, कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठक संपल्यानंतर बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या बांधणीबाबत माहिती दिली. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, बाबू नायर, माऊली थोरात, राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.

खासदार बापट म्हणाले की, 100 टक्के नाही परंतु, 70 टक्के तरी विकास कामे आम्ही मार्गी लावली आहेत. उर्वरीत कामे मार्गी लावण्यात येतील. पवना धरणाच्या संबंधीत काही तक्रारी आहेत. फौजदारी कारवायांचे काही प्रकरणे आहेत. त्याचा पाठपुरावा करून मार्ग काढण्यात आमची दमछाक होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यातील बाधित शेतक-यांना पुनर्वसनासाठी पालिकेने रक्कम दिलेली आहे. हे काम केव्हा पूर्ण होईल, याची मुदत दिली जाणार नाही. पवना बंदिस्त जलवाहिनी शेतक-यांना विश्वासात घेऊनच पूर्ण केली जाईल, असेही बापट यावेळी म्हणाले.

भाजप जगातील क्रमांक एकचा पक्ष – बापट

भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. मागे भाजपचे १० कोटी सदस्य नोंदविले होते. आता नवीन सात कोटी सदस्य नोंदविले असल्याने एकुण सुमारे १७ कोटी सदस्य असलेला भाजप जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगाने मतदारांशी संपर्क, सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे तसेच आघाडी प्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठका, अशा प्रकारे कार्यक्रम राबवले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने सुमारे ४० ते ४५ हजार मतदारांची शहरातून नोंदणी करून घेतली आहे. सुमारे ३० ते ३५ हजार दुबार व मयत मतदारांची नावे वगळली आहेत, असेही बापट यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button