breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कोविड-19 मध्ये कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये – खासदार डाॅ. अमोल कोल्हे

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला दणका, Fabiflu या गोळीची किंमत ७५ रुपये केल्याने लढ्याला पहिले यश

पुणे |महाईन्यूज|

शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ‘FABIFLU’च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली आली असून, ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन ७५ रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशी माहीती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

देशभरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच एका गोळीची किंमत रु. १०३ यानुसार १४ दिवसांच्या उपचारासाठी रु.१२,५०० इतका दर निश्चित केला होता.ग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ.कोल्हे यांनी दि. २४ जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती.

इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कोविड उपाययोजने बाबतच्या आढावा बैठकीत ग्लेनमार्कच्या दाव्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी डॉ.कोल्हे यांनी Fabiflu या गोळीची रु. १०३ ही किंमत अवास्तव असून भारतातील गरीब, निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर ग्लेनमार्कने केलेली चाचणी प्रोटोकॉल समरीनुसार को-मॉर्बिड परिस्थितीत Fabifluचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेली नसल्याकडे डॉ. कोल्हे यांनी सांगत सर्वांचे‌ लक्ष वेधले होते.

डॉ.कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान डॉ.कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे. खासदार डॉ.कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच औषधाची किंमत कमी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागरुकतेबद्दल वैद्यकीय व्यवसायातील जाणकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.

डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, कोविड-१९ च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशाप्रकारे दावे वा जाहिराती करून सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ग्लेनमार्कने Fabiflu या गोळीची किंमत ७५ रुपये केल्याने या लढ्याला पहिले यश मिळाले असून पुढील काळात सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि उपचाराचा खर्च आवाक्यात राहावा यासाठीचा आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे डॉ.कोल्हे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button