breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना नियंत्रणासाठी ‘पुन्हा एकदा लॉकडाउन’ हा पर्याय ठरू शकत नाही

  • पुणे जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे लॉकडाउनमधून वगळावीत
  • चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांची मागणी


पिंपरी –  पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे १० दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. यामुळे लघुउद्योजक, कारखानदार, दुकानमालक व कामगारांवर मोठे आर्थिक संकट येणार आहे. व्यवसायिक घरी बसून कामगारांना पगार देऊ शकणार नाहीत. पुन्हा नव्याने उभे केलेले व्यवसाय अडचणीत येतील तर, काही देशोधडीला लागतील. याऐवजी शासनाने पुणे जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंद्यांना लॉकडाउनमधून सूट द्यावी अन्यथा लॉकडाऊनमधून उद्योगधंदे वगळावीत, अशी मागणी चाकण एमआयडीसी फेज ३, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. सोमवारी (दि. १३ जुलै) मध्यरात्रीपासून ते २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन असेल. या आधीही केंद्र सरकारने २१ मार्चपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे, लघुउद्योजकांचे, शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे. राज्य सरकारने ५ मे पासून उद्योगधंद्यांना सशर्त सुरु करण्याची परवानगी दिली. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे मोठ्या अडचणीत होते. कामगारांची वानवा, खेळत्या भांडवलाची अडचण, कस्टमरकडून पेमेंट वेळेवर न मिळणे, निरनिराळे फिक्स खर्च, कर्जाचे हप्ते, कारखान्याचे भाडे, लाईट बिल, पाणीबिल आदी अडचणींचा सामना उद्योजकांना करावा लागला. केंद्र सरकारने MSME अंतर्गत जाहीर केलेल्या योजनांस केवळ काही ठरावीक उद्योजकच पात्र ठरले. इतर लघुउद्योजकांचे काय? हे सर्व करतानाच उद्योजकांनी कोविड-१९ बाबत सर्व निकष काटेकोरपणे पाळले. केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू केली आहे. जवळपास दोन महिन्यानंतर व्यवसायाची घडी हळूहळू व्यवस्थित होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, असेही अक्कलकोटे यांनी म्हटले. 

अशा गंभीर अवस्थेतून उद्योजक बाहेर पडत असतानाच, राज्य सरकारने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा एकदा लॉकडाउन हा पर्यायच ठरूच शकत नाही. देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्योगधंदे पुन्हा बंद करणे म्हणजे ‘स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे’. त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय व्यवहार्य नाही. लघुउद्योजक, व्यापरीवर्ग उद्योगधंदे रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमुळे कामगारांचे पगार बंद होतील. मुलांच्या शाळेचा व इतर खर्च कामगार कसे भागविणार. मागील दोन महिन्यात कामधंदा बंद झाल्यामुळे नैराश्यापोटी कामगारांच्या आत्महत्यांचे प्रमाणे खूप वाढले आहे. त्यावर कसे नियंत्रण मिळविणार. लॉकडाऊनऐवजी ज्या देशांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी तिथल्या सरकारने आणि नागरिकांनी ज्या उपाययोजना अवलंबविल्या, त्या सर्व उपाययोजनांचा अभ्यास करून, त्याची आपल्या देशामध्ये अंमलबजावणी करावी. शासनाने पुणे जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंद्यांना लॉकडाउनमधून सूट द्यावी अन्यथा लॉकडाऊनमधून उद्योगधंदे वगळावीत. पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करून, सध्याची गंभीर स्थिती आणखीनच गुंतागुंतीची करू नये, असे या पत्रकात जयदेव अक्कलकोटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button