breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनानंतर आता मुंबईवर आणखी एका आजाराचे संकट

आता कुठे कोरोनाच्या संकटाशी मुंबईकरांनी सामना करत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता कोरोनाचं संकट जात नाही तोच मुंबईत मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट मलेरिया रुग्ण सापडल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. मुंबईवर आलेल्या या संकटामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात ४३८ मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे ८७२ रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांना करोनाचीही लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.

दरवर्षी जून आणि जुलैमध्ये मलेरियाचे रुग्णसंख्या दुप्पट होत असते. यंदाही जुलैमध्ये मलेरियाचा आकडा दुप्पट वाढला आहे. त्यात दोन जणांनाच मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय करोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे २९ रुग्ण सापडले होते. यंदा जुलैमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार असून या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षही सुरू करणार आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याचं मान्य केलं आहे. मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ नयेत म्हणून झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये पालिकेने फवारणी केली आहे. अडगळीतील सामानही हटवण्यात आले आहे. मात्र, बांधकांमांच्या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना फवारणी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी फवारणी होत नाही, परिणामी मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होतात. एकदा अळ्या निर्माण झाल्या की त्या त्याच ठिकाणी थांबत नाहीत. दूरवर पसरतात. परिणामी साथीचे आजार निर्माण होतात, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button