breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार सरी

मुंबईसह कोकण विभाग आणि पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत सोमवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विदर्भातही पावसाने हजेरी लावली. मात्र, मराठवाडय़ाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारीही कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

राज्याच्या बहुतांश भागांत गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस होता. मराठवाडय़ात मात्र तुरळक ठिकाणीच हलक्या सरी कोसळल्या. मुंबई, पुण्याला पाणीपुरवठा होत असलेल्या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे.

मराठवाडय़ामध्ये सध्या पावसाचा जोर नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. सोमवारी औरंगाबादमध्ये तुरळक पाऊस झाला.

मात्र, दोन- तीन दिवसांमध्ये या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सकाळपासून चांगला पाऊस होता. तेथे २६ मि. मी. पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे ७९ मि. मी. पाऊस झाला. नगर जिल्ह्यासह सातारा, नाशिक, कोल्हापूर येथेही पावसाची नोंद झाली. विदर्भामध्ये गोंदियात १३ मि. मी. पाऊस नोंदविला गेला. बुलढाणा, वाशिम, नागपूर येथेही पावसाची नोंद झाली.

पाऊसभान : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ९ ते १२ जुलैदरम्यान कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत आणि विशेषत: ९ जुलैला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये ९ ते १२ जुलै या कालावधीत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button