breaking-newsमहाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे आघाडीवर

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार निरंजन डावखरे ४०८० मतांनी आघाडीवर आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यात मुख्य लढत आहे. निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला.

नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान एक मतपेटीत दोन जास्त मतपत्रिका सापडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. मतपेटीत ४६२ मतपत्रिकांऐवजी ४६४ मतपत्रिका आढळल्या. या निवडणुकीत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान झाले होते.

मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपचे अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यात चुरस आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अमित मेहता, काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, डॉ. दीपक पवार, जालिंदर सरोदे यांच्यासह १२ उमेदवार आहेत.

नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप बेडसे, किशोर दराडे आणि अनिकेत पाटील यांच्यामध्ये लढत आहे. अनिकेत पाटील भाजपाचे तर किशोर दराडे शिवसेनेचे उमेदवार आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये मतमोजणीसाठी वेगळी पद्धत असते. एकूण वैध मतांच्या ५० टक्के मते मिळाली तरच तेवढी मते मिळणारा उमेदवार पहिल्या फेरीत विजयी म्हणून जाहीर केला जातो. एकूण वैध मतांच्या ५० टक्के कोणत्याही उमेदवाराला न मिळाल्यास पुढील पसंतीची मते मोजली जातात. त्यातही अनेकदा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होत नाही. मग सर्व मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये पारंपरिक मतपत्रिकांचा वापर केला जात असल्याने मतमोजणीला बराच वेळ जातो. कारण ५० टक्के मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास पुन्हा सर्व मतपत्रिका मोजाव्या लागतात.राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ किती आहेत? ७८ सदस्यीय विधान परिषदेत सात मतदारसंघ हे पदवीधर तर सात मतदारसंघ हे शिक्षकांसाठी आहेत. एकूण १४ सदस्य हे पदवीधर व शिक्षकांमधून निवडले जातात. ३० सदस्य हे विधानसभेतून निवडले जातात, २२ सदस्य हे स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. १२ सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button