breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा पुन्हा हिरमोड

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा कोरोनाचा चांगलाचं फटका बसला आहे. कोकणवासियांसाठी यंदाचा गणेशोत्सवास हवा तसा नेहमीप्रमाणं सोपा राहिलेला नाहीये. एकीकडे ई-पासच्या सक्तीमुळे खासगी वाहनाने कोकण गाठणे मनस्ताप देणारे ठरत असताना कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मोजक्याच विशेष रेल्वेगाड्यांकडे चाकरमानी आशेने पाहत होते. त्यात खाजगी वाहन सोडली तरी एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली होती त्यामुळे त्यांना थोडासा तरी दिलासा मिळाला होता. मात्र, आज घडलेल्या एका दुर्घटनेने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा ठप्प झाली असून चाकरमान्यांचा हिरमोड झालाय. हा मार्ग पुढचे ८ ते १० दिवस बंद राहण्याची शक्यता असून क्वारंटाइनची अट लक्षात घेता आता रेल्वेची दारे चाकरमान्यांसाठी बंदच झाली आहेत.

कोकण व गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. सावंतवाडी जवळचं मडुरे स्टेशन सोडल्यानंतर गोव्याच्या हद्दीत असलेल्या पेडणे बोगद्यात मध्यभागी भलीमोठी भिंत ट्रॅकवर कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे. चाकरमान्यांसाठी ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. भिंतीचा मोठा भाग रुळांवर कोसळला असल्याने व पावसाची संततधार सुरूच असल्याने हा ढिगारा लगेचच हटवला जाण्याची शक्यता नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रुळ मोकळा करण्यास आणखी ८ ते १० दिवस लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या मार्गावरून दक्षिण भारतात जाणाऱ्या सर्व विशेष गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून दक्षिण भारतात जातात. रेल्वेची नियमित सेवा बंद असली तरी विशेष गाड्या मात्र धावत असून यापैकी प्रामुख्याने नेत्रावती व मंगला एक्स्प्रेसने कोकणात जाण्याचा पर्याय अनेकांपुढे होता. मात्र आता या सर्वच गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्याने चाकरमान्यांना रेल्वेने कोकणात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असताना राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १४ ऐवजी १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित केला आहे. मात्र, त्याबाबतच्या गाइडलाइन्स अद्याप स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही १४ की १० हा गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यात एसटी बस वगळता अन्य खासगी वाहनांनी जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सक्ती आहे. या स्थितीत चाकरमानी पुरता मेटाकुटीला आला आहे. गणेशोत्सवाआधी अनेक विघ्ने पार करूनच त्याला गाव गाठावा लागणार हे निश्चित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button