breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील, सिटी केअर आणि स्टार मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांना नोटिसा

  • खुलासा सादर करण्यासाठी दिली आठ दिवसांची मुदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाची गंभीर लक्षणे नसताना देखील रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. याबरोबरच कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारास अनुज्ञेय नसलेल्या विविध बाबींवर बिल आकारणी करण्यात आल्याने चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

या रुग्णालय व्यवस्थापनाला खुलासा सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. नियमांचे उल्लंघन करून रुग्णांकडून वाढीव बिले घेतल्याने तसेच रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त नसताना त्याचा दाखल करून घेतल्याने आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा देखील करण्यात आली आहे. बिलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांनी या रुग्णालय व्यवस्थापनाचे चांगलेच कान उपटले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. शहरातील 25 ते 30 खासगी रुग्णालयाने कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, रुग्णांचे नातेवाईक, सर्वसामान्य नागरिकांडून आल्या होत्या.

याची तपासून करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी समितीची स्थापना केली आहे. आयकर विभागाचे एन. अशोक बाबू समितीचे नेतृत्व करत आहेत. या समितीने शहरातील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली. या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठीचे शुल्क, एक्सरे शुल्क, औषध खर्च करण्यासाठीची आकारणी केली जाते. ही आकारणी राज्य सरकारच्या निर्णयानुसार पीपीई किट वगळता 4 हजार, 7500 आणि 9 हजार रुपये अशा तीन दराप्रमाणे कोणत्या प्रकारचा उपचार दिला जातो. त्यानुसार बिल आकारणी करणे अपेक्षित आहे.

या विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याचे समोर आले. ही बिल आकारणी योग्य नाही. त्यामुळे रुग्णालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.

पीपीई किटचा ताळमेळ लावूनच दर आकारणीचे निर्देश

केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल न करून घेण्याचे निर्देश आहेत. त्याचे उल्लंघन करून असे रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे देखील या चार रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय पीपीई किटचे दर आकारणीबाबत, एकूण दाखल रुग्णांची संख्या आणि वापर केलेल्या पीपीई किट याचा ताळमेळ घेऊन पीपीई किटचे दर आकारणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

चौकशी समिती यापुढेही कोविड रुग्णालयांना भेट देणार

सर्व रुग्णाच्या बिल देयकांची फेरमोजणी करून त्यांना अनुज्ञेय असणारा परतावा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. निर्देश, निकष, नियमांच्या उल्लंघनाबाबत नोटीस जारी केलेल्या रुग्णालयांनी एक आठवड्यात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या रुग्णांना डिपॉझिट घेण्याअगोदर रुग्णालयात दाखल करून घेणे. उपचार सुरू केल्यानंतर नातेवाईकांना सांगावे. यापुढेही चौकशी समिती कोविड रुग्णालयांना भेट देणार आहे.

दरपत्रक दर्शनी भागावर लावणे अनिवार्य

कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करावे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार कोरोना रुग्णांचे बिलाचे निश्चित केलेले दरपत्रक दर्शनी भागात लावावे. दरपत्रकाप्रमाणे बिलांची आकारणी करण्याचे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button