breaking-newsआंतरराष्टीय

सौदी अरेबियाच्या समुद्रात इराणच्या तेल टँकरवर रॉकेट हल्ला

लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

रॉकेट हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटामध्ये तेल टँकरवरील दोन स्टोअर रुमचे नुकसान झाले असून समुद्रात तेल गळती सुरु आहे. इराणच्या सरकारी तेल कंपनीच्या मालकीचा हा तेल टँकर होता. सौदीच्या जेद्दा बंदरापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. लाल समुद्रात घडलेल्या या घटनेची आपल्याला कल्पना आहे पण त्यावर कोणीतीही प्रतिक्रिया देण्यास अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटच्या प्रवक्त्याने नकार दिला.

१४ सप्टेंबरला आखातामधील सौदी अरेबियाच्या दोन तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे सौदीला तेल उत्पादन निम्म्याने कमी करावे लागले. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आखातमध्ये याआधी सुद्धा तेल टँकरवर हल्ले झाले होते. अमेरिकेने या सर्व हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले होते. पण इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावले.

होरमुझच्या खाडीत तेल टँकरवर झालेले हल्ले, इराणने पाडलेले अमेरिकेचे ड्रोन या घटनांमुळे मागच्या काही महिन्यात या भागात मोठया प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. युद्धाचे इशारे दिले जात होते. अमेरिकेचे  ड्रोन पाडल्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचीही तयारी केली होती. पण अखेरच्या क्षणी डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरचा अण्वस्त्र करार रद्द केला व त्यांच्यावर निर्बंध लादले तेव्हापासून आखातमध्ये संघर्षाला सुरुवात झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button