breaking-newsमहाराष्ट्र

कुपवाडजवळ दीड लाखाची सुगंधी तंबाखू जप्त

सांगली – स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) च्या पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काल (ता.13) रात्री कुपवाड हद्दीत पेट्रोलिंग करताना तासगाव फाट्यावर सुगंधी तंबाखू व सुपारीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखाची सुगंधी तंबाखू, सुपारी आणि नॅनो मोटार असा साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

गुटखा आणि मावा तयार करण्यासाठी ही तंबाखू वापरली जाते. याप्रकरणी मिनाज जुबेर म्हेत्तर (वय 23), इर्शाद बशीर पठाण (वय 33, दोघे रा. मोमीन मोहल्ला, तासगाव) यांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर “एलसीबी’ च्या पथकास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक सांगली, मिरज आणि कुपवाड हद्दीत गुरूवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी निरीक्षक पिंगळे यांनी एका मोटारीतून सुभाषनगर ते तासगाव रस्त्यावरून नॅनो मोटार (एमएच 12 एचझेड 1384) मधून सुगंधी तंबाखू व सुपारीची तस्करी होणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यामुळे त्यांनी तत्काळ पथकास सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पथकाने कुपवाड पोलिस ठाणे हद्दीतील तासगाव फाट्यावर सापळा रचला. तेव्हा सदरची मोटार तेथून जात असताना पथकाने ती अडवली. आतमध्ये पोत्यात काहीतरी झाकून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत विचारल्यानंतर सुगंधी तंबाखू व सुपारी असल्याचे दोघांनी सांगितले.

मोटारीतील मालाची तपासणी केल्यानंतर आतमध्ये दीड लाख रूपयाची सुगंधी तंबाखू व सुपारी आढळली. दीड लाखाची तंबाखू, सुपारी आणि मोटार असा साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे जप्त माल व संशयित आरोपींना सुपूर्द केले.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, कर्मचारी अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले यांनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button