Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई

‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’, शिवाजी महाराजांच्या वेशात आलेल्या आमदाराचा सवाल’

विधानभवनावर आज (गुरुवारी २२ नोव्हेंबर २०१८) शेतकरी तसेच आदिवासींनी आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चा धडकणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या आमदारांमध्ये वादळी चर्चा झाली. असे सगळे असतानाच आज विधानभवन परिसरात आणखी एका विषयाची चर्चा होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये कामकाजात सहभागी होण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये यांची.

डोक्यावर मुकूट, गळ्यात माळा, कपाळावर टिळा आणि भगव्या रंगांच्या राजेशाही वस्त्रांमध्ये आज गजभिये यांनी विधानभवनाच्या आवारात प्रवेश केला. राज्यामध्ये कोणालाच न्याय मिळत नसून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार स्थानापन्न झालं त्याचा छत्रपतींचाच सरकारला विसर पडला असल्याने आपण या वेशभूषेमध्ये विधानभवनात आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आरक्षणावरून सरकारवर टिका
सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमधील मंत्र्यांनी बारामतीमध्ये जाऊन आश्वासन दिलं होतं की आम्ही धनगरांना आरक्षण देऊ. मात्र पुढे त्या आश्वासनाचं काहीही झालं नाही. तसेच ज्या छत्रपतींच्या नावाने सरकार स्थानापन्न झालं, ज्या छत्रपतीचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहो असं निवडणुकांमध्ये सांगण्यात आलं ते सरकार आता छत्रपतींना विसरललं आहे अशी टिका गजभिये यांनी केली. आरक्षणावर सभागृहात नुसत्या चर्चा होतात. आश्वासने दिली जातात मात्र होत काहीच नाही अशी खंतही गजभिये यांनी व्यक्त केली.

शिवस्मारकाच्या नावाने सरकार तोंडाला पाने पुसतेय
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकावरूनही गजभिये यांनी सरकारला धारेवर धरले. शिवस्मारक अरबी समुद्रात उभं करण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न होतं. मात्र केंद्रात पाच वर्षे पुर्ण झाली त्या ठिकाणी केवळ भूमिपूजन झालयं. भूमिपूजन करुन सरकार केवळ तोंडाला पाने पुसण्याचं काम करत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. तसेच सत्तेत येण्यासाठी गडकिल्ल्यांसंदर्भात केलेल्या आश्वासनांचीही आठवण गजभिये यांनी सरकारला करुन दिली. राज्यातील सर्व गडकिल्ल्यांची दुर्दशा झालीय आम्ही किल्ल्यांची डागडुजी करु, पुर्नबांधणी करु, पुन:निर्माण करु असं सांगितलं गेलं पण त्याच्याकडेही सरकारचे पूर्णपणे दूर्लक्ष झालं आहे असा आरोप त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकही अद्याप बांधण्यात आलेले नाही यासंदर्भातली आठवणही गजभिये यांनी करुन दिली.

पानभर जाहिराती तरी आत्महत्या का
राज्यात आज शेतकरी बांधव आत्महत्या करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यात इंगळे नावाच्या शेतकरी महिलेने स्वत:चे सारण रचून आत्महत्या केली पण सरकारला जाग येत नाहीय. सरकार केवळ मोठ्या जहिराती देत आहे. पेट्रोल पंपावर जाहिरात, पेपरमध्ये सरकारच्या कामाबद्दलच्या संपूर्ण पानभर जाहिराती केल्या जात आहेत. असे असतानाचाही मग लोकं का आत्महत्या करतायत? का व्यापारी सरकारशी नाराज आहेत असे सवालही गजभिये यांनी उपस्थित केले. संपूर्ण राज्यात पिण्याला पाणी नाही. दुष्काळामुळे शेतकरी जळतोय होरपळतोय मरतोय तरी सरकार न्याय देत नाहीय. म्हणूनच मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये विधानभवनात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मूक-बधीर आंधळ सरकार
या राज्यातला गरीब होरपळला जातोय. तरी सरकार मुक बधीर आंधळ झाल्यासारखं वागत असून या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. जर सरकारने शेतकऱ्यांना खरा न्याय दिला असता तर आज मोर्चा विधानभवना बाहेर नसता. सरकारकडून आदिवाश्यांनाही न्याय देण्यात आलेला नाही.

मी आज शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विधानभवनात आलोय त्यामुळे तरी हे सरकार वटणीवर येईल, सरकारला वाचा फुटेल. छत्रपतींच्या नावा करता त्यांचा सन्मान ठेवण्याकरता तरी सरकार उत्तर देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गजभिये यांनी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचून दाखवला. राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असून त्यांना वाचवण्याकरता आपण महाराजांच्या वेशभूषा केली असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य कर्मचाऱ्यांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांकडेच सरकारचे दूर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोरगरीब कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार होते तेही सरकारने केलेले नाही. पत्रकारांवरील हल्लेही थांबले नाही. १२ लाख कोटींची एमपीए झाला आहे. तीन लाख कोटीं घेऊन पळालेल्यांना अटक नाही अशी कयदा सुव्यवस्थेची अवस्था आहे तर दुसरीकडे सरकारी हॉस्पीटलमध्ये औषधेही नाहीत ही आरोग्य व्यस्थेची अवस्था आहे. राज्याची अशी दूर्दशा झालेली असताना कुठल्या आघाडीवर हे सरकार काम करतयं हेच समजत नाहीय असं सांगताना हे सगळं पाहून सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असाच प्रश्न मला पडत असल्याचे गजयभिये म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button