breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

फॅक्ट चेक : भोसरीच्या उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे नियमानुसारच आहेत काय ?

  •  माजी आमदार विलास लांडे यांच्या आक्षेपात किती तथ्य?
  •  प्रशासनाची भूमिका प्रवाशी, नागरिकांच्या किती सुरक्षेची?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास १२ वर्षे झाली आहेत. १२ वर्षानंतर उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे लावण्याचे शहाणपण महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचले आहे. सुरक्षा कठड्यांची खरंच आवश्यकता आहे का? मग, इतकी वर्षे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळत होती का? असा प्रश्न माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित केला. त्यानंतर सुरक्षा कठड्यांचा विषय चर्चेत आला. याबाबत ‘महाईन्यूज’ने वस्तुस्थिती जाणून घेतली.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी उड्डाणपुलाच्या कामाला २००७ मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता होती. २०१० मध्ये उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले. कोणतेही उड्डाणपूल सुरू करताना त्याच्या ‘सेफ्टी एनओसी’ संबंधित विभागाकडून घेण्यात येतात. भोसरी उड्डाणपुल सुरू करतानाही ‘सेफ्टी एनओसी’ घेतल्या आहेत. आता १२ वर्षांनंतर उड्डाणपुलावर सुरक्षा कठड्यांची आवश्यकता होती. त्यासाठीच कठडे बसवण्यात येत आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. किंबहुना, एखादी दुर्घटना झाल्यानंतरच सुरक्षेची काळजी घ्यायची का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरील क्रॅश बॅरिअरचा अभ्यास केला असता, पिंपळे गुरव किंवा हिंजवडीहून भोसरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील क्रॅश बॅरिअची उंची १.०५ मीटर इतकी आहे. पुण्याहून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर क्रॅश बॅरिअरची उंची १.५ मीटर इतकी ठेवली आहे. ‘आयआरसी’अर्थात इंडियन रोड काँग्रेसच्या अटीशर्तींची किमान पुर्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, भोसरी उड्डापुलाखाली आणि वर अशा दोन्ही मार्गांवर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून दुरूस्ती आणि डांबरीकरण सुरू आहे. १२ वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या पुलाची बांधणी १० वर्षांपूर्वी पूर्ण झाली आहे. त्यावेळच्या आयआरसी नियमानुसार, या उड्डापुलाची निर्मिती केली आहे. दुरुस्ती करीत असताना प्रशासनाच्या लक्षात आले की, पुलाच्या क्रॅश बॅरिअरची उंची नियमानुसार कमी अर्थात सुमारे ९०० मीमी इतकीच आहे. आता प्रश्न उपस्थित झाला की, १२ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाची सेफ्टी एनओसी चुकीच्या पद्धतीने दिली होती का? तर असे मुळीच नाही.

‘आयआरसी’च्या निर्देशानुसार, एखाद्या उड्डाणपुलाची लांबी ३०० मीटरपेक्षा जास्त असेल, तर क्रॅश बॅरिअरची उंची किमान १.५ मीटर असावी, असे म्हटले आहे. २०१५ मध्ये ‘आयआरसी’ने नवीन मार्गदर्शक तत्वे (आयआरसी ५-२०१५, सीएल १०९.७.२.३) जाहीर केली. त्यावेळी प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सूचनांची तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षीत होते. मात्र, प्रशासनाने केली नाही किंवा २०१७ पर्यंत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला तसे सूचवले नाही.

  • ‘आयआरसी’म्हणाजे काय?

इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) ही देशातील महामार्ग अभियंत्यांची सर्वोच्च संस्था आहे. ‘आयआरसी’ ची स्थापना डिसेंबर १९३४ मध्ये करण्यात आली आहे. या संस्थेला ‘जयकर समिती’ म्हणून ओळखले जाते. भारतीय रस्ते विकास समितीच्या शिफारशींवर संस्थेची निर्मिती केली आहे. भारतातील रस्ते विकासाच्या उद्देशाने ही संस्था काम करीत असते.

  • अधिकारी काय म्हणतात…

आयआरसीच्या नवीन मानांकनानुसार, भोसरी उड्डाणपुलाच्या क्रॅश बॅरिअरची उंची कमी असल्याने आम्ही ती उंची वाढवण्यासाठी सुरक्षा कठडे वाढवण्याचे काम हाती घेतले आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

  • स्थानिक नागरिक काय म्हणतात…

पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. गतीरोधक पूल असल्यामुळे वाहनांचा वेगही जास्त असतो. तीन-चार वर्षांपूर्वी एक चारचाकी वाहन पुलावरुन खाली कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच, पुलाखालील रस्त्यावरही मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा कठडे बसवले असतील तर स्वागतार्ह आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहेत.

  • निष्कर्ष :

माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी उड्डाणपुलाच्या क्रॅश बॅरिअरबाबत उपस्थित केलेले प्रश्न वस्तुस्थिती आणि ‘आयआरसी’च्या नियमाला अनुसरुन नाहीत. प्रशासनाची भूमिका प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button