उद्धव ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीची बैठक…
मुंबई | महाविकास आघाडीतील बिघाडीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होत असून त्यात अनेक मुद्द्यांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली राज्यपालांची भेट, त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडं थेट तशी मागणीच केल्यानं त्यात भर पडली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीवर बोलताना अप्रत्यक्षपणे याची कबुली दिली होती. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा सरकारला पाठिंबा आहे. पण आम्ही तिथं ‘डिसिजन मेकर’ नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यातून आघाडीतील दुरावा अधिकच उघड झाला होता. आघाडीतील आमदारांच्या फुटीचीही चर्चा सुरू होती.