breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात भाजपची बाजी पण बहुमतासाठी करावी लागणार कसरत

  • कॉंग्रेसला नामुष्कीजनक पराभव; त्रिशंकु स्थितीमुळे राजकीय घडामोडींना वेग 

बंगळुरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत 107 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. कॉंग्रेसला 74 जागा मिळाल्या असून जनता दल सेक्‍युलर पक्षाला 39 जागा मिळाल्या आहेत. दोन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. या त्रिशंकु स्थितीमुळे कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार हा कळीचा मुद्दा बनला आहे. येथे बहुमताला 112 जागा आवश्‍यक आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेची सारी सूत्रे आता जेडीएसच्या हातात गेली आहेत.

जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे रामनगरम आणि चन्नापटना या दोन्ही मतदार संघातून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी 112 ऐवजी 111 जागाच पुरेशा ठरणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामैय्या हेही दोन मतदार संघातून निवडणूक लढवत होते. त्यापैकी चामुंडेश्‍वरी मतदार संघातून ते पराभूत झाले तर बदामी मतदार संघातून ते विजयी झाले आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा हे शिकारपुर मतदार संघातून विजयी झाले आहेत.

या निवडणूकीत कॉंग्रेसला अनुकुल वातावरण असताना भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारून सर्वांनाच आश्‍चर्य चकीत केले असले तरी त्यांना बहुमता इतके संख्याबळ मिळू शकलेले नाही. कर्नाटकच्या सर्वच विभागात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगीरी नोंदवली. म्हैसुरचा बेल्ट वगळता त्यांना इतरत्र सर्वत्र चांगले यश मिळाले आहे. विशेष म्हणजे लिंगायत, आणि दलित तसेच मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या भागातही भाजपला मोठे यश मिळाल्याने तो एक कुतुहलाचा विषय ठरला आहे. आज झालेल्या मतमोजणीच्यावेळी भाजपने सुरूवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसवर मात केली. तथापी ते बहुमताच्या जवळ पोहचतील की नाहीं याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत ताणली गेली होती.

मतमोजणीच्या आघाडीनुसार त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला तब्बल 118 मतदार संघात आघाडी घेतल्याने भाजपला पुर्ण बहुमत मिळाल्याचे वातावरण होते पण ते वातावरण मात्र नंतर बदलले आणि त्यांच्या जागांचा आकडा बहुमताच्या मागे गेला. निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेले दोन्ही वादग्रस्त रेड्डी बंधु आपआपल्या मतदार संघात विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महादेयी नदीच्या पाणी वाटपाचा वादही चांगलाच रंगला होता. या नदीच्या पट्ट्यातील मतदार संघातही भाजपने वर्चस्व राखले. त्या पट्ट्यातील आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर पाच जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले.

कावेरी लवादाच्या पट्ट्यातील तब्बल 27 जागांवर जेडीएसचे उमेदवार विजयी झाले आहेत. वोक्कलिंग समाजाच्या प्रभावाखालील मतदार संघात या समाजाने जेडीएसची साथ केल्याने त्यांना आपल्या जागा वाढवण्यात यश मिळाले. तटवर्तीय कर्नाटकात भाजपने 11 ते कॉंग्रेसने 6 जागांवर यश मिळवले आहे.

कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या प्रभावाखालील मतदार संघात मतमोजणीच्यावेळी तब्बल 29 जागांवर भाजपचे, 9 जागांवर कॉंग्रेसचे आणि 6 जागांवर जेडीएसचे उमेदवार आघाडीवर होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button