कर्नाटकातील ३ हजाराहून अधिक कोरोना रूग्ण गायब
बंगळुरू – कर्नाटक राज्यात संपूर्ण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजार पार झाली आहे. अशातच आता राज्याची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधून तब्बल ३ हजार ३३८ कोरोना रुग्ण गायब झाले आहेत. हे रुग्ण कुठे गेले, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे.
सध्या प्रशासन बेपत्ता झालेल्या या ३ हजार ३३८ रुग्णांचा शोध घेत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णांना ट्रॅक करण्याचे कोणतेही साधन नाही आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या सर्व रुग्णांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे की नाही? याबाबतही प्रशासनाला कोणतीही माहिती नाही.
बंगळुरू महापालिकेचे आयुक्त एन मंजुनाथ प्रसार यांनी सांगितले की, ‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी आम्ही पोलिसांची मदत घेतली आहे. मात्र बेपत्ता झालेले ३ हजार ३३८ रुग्ण शोधणे कठिण आहे. काही रुग्णांनी फोन नंबर आणि पत्ते चुकीचे दिले आहेत. कोरोना झाल्याच्या भीतीने किंवा क्वारंटाईन होण्याच्या भीतीने हे नागरिक बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.’ दरम्यान, एकूण कर्नाटक राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण बंगळुरूत आहेत.