breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू-देवेंद्र फडणवीस

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच, ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळेल अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी होणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

वाचा :-उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच, ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी केलं जाणार नाही, हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं. ओबीसी आरक्षणावरून दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांवरही टीका केली. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. काहीही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

ओबीसींचा विकास होणार नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. त्यामुळे ओबीसींची विकास झाला पाहिजे. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असं ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचं योगदान मोठं आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटलं जायचं असं सांगतानाच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button