breaking-newsमहाराष्ट्र

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेकडे दुर्लक्ष

  • छगन भुजबळ यांचा आरोप

इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी, या मागणीकडे सत्ताधारी नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. सध्याच्या सरकारने या संदर्भात आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जालना जिल्हय़ातील दोदडगाव येथे एका कार्यक्रमात सांगितले.

लोकसभेत गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ  यांनी इतर मागासवर्गीयांच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्ष जनगणनेच्या वेळी हे काम झाले नाही. ज्या यंत्रणेकडे हे काम द्यावयास पाहिजे होते, त्याऐवजी दुसऱ्याच यंत्रणेवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. आपल्या देशात कुत्र्या-मांजरांची गणना होते, परंतु इतर मागासवर्गीयांची जनगणना मात्र केली जात नाही, असे   गोपीनाथ मुंडे म्हणत असत.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाडय़ात मुलींची पहिली शाळा काढली. त्या काळी इतर मागासवर्गीयांतीलच नव्हे तर ब्राह्मण वर्गातील मुलीही शिक्षण घेण्यापासून वंचित असत. फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शाळेचा फायदा सर्वच घटकांतील महिलांना झाला. अलीकडेच भिडेवाडय़ापासून जवळ असलेल्या गणपती मंदिर परिसरात अथर्वशीर्ष पठणासाठी हजारो महिला जमल्या होत्या. परंतु त्यातील दोन महिलाही भिडेवाडय़ातील शाळेच्या दर्शनासाठी गेल्या नाहीत! इतर मागासवर्गीय मंडळी वाचन करीत नाहीत. त्यामुळे त्यांना नेमके काय चालले आहे, हे कळत नाही.

माजी आमदार नारायण मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर लिहिलेल्या ‘आकाशाला गवसणी’ या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार शिवाजी चोथे, जि.प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, माजी आमदार धोंडिराज राठोड, जालना जिल्हा शिवसेनाप्रमुख भास्कर अंबेकर, भाऊसाहेब पाऊलबुधे, समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे, प्रा. सत्संग मुंडे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button