breaking-newsपुणे

ऐन सणासुदीत पुण्यात पाणी टंचाई

पुणे – शहर आणि उपनगरांमध्ये नवरात्रातील पहिल्या माळेपासून सुरू झालेली ‘पाणीबाणी’ नवव्या दिवशी म्हणजे, मंगळवारीही कायम राहिली. आठवडाभर पाणीटंचाई ओढवल्याने दसऱ्याच्या तोंडावर सणासुदीच्या काळात लोकांची ओढाताण सुरू आहे. आधी ज्या भागांत तीन-साडेतीन तास पाणीपुरवठा होता, तिथे आज तासभरही पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. पाणी साठवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र शहरभर आहे. पाण्याच्या संकटामुळे पुणेकर संतप्त झाले आहेत.

पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा करणाऱ्या पालकमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या डोळ्यांदेखतच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लोकांवर आली; तरीही, पाणीपुरवठा सुरळीत करून पुणेकरांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुण्याच्या कारभाऱ्यांनी आणि प्रशासनाने एकही पाऊल उचललेले नाही. महापालिका आणि जलसंपदा खात्यातील वादामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे भासविले असले तरी, ही पाणीकपात आहे का, हे महापालिका जाहीर करण्याचे धाडसही दाखवत नाही. त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार की नाही? याचे उत्तर तूर्तास तरी कोणाकडेही नाही. त्यामुळे दसऱ्यानंतर म्हणजे दिवाळीतही पुणेकरांना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे तूर्तास दिसत आहेत.

दरम्यान, कोंढवा, मिठानगर, लुल्लानगर, शिवनेरीनगर, एनआयबीएम रस्ता आदी भागात पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. अनधिकृत बांधकामांची संख्या आणि त्याला देण्यात आलेल्या बेकायदा नळजोडांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा फटका अधिकृत बांधकाम असलेल्या घरांना बसत आहे. पाणीपुरवठा एक ते दीड तास होतो, तोही कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. पाण्याची अतिरिक्त गरज भागविण्यासाठी नागरिकांना टॅंकर विकत घ्यावा लागतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button