breaking-newsराष्ट्रिय

एनडीए राज्यसभेत बहुमताजवळ, हवेत फक्त ६ खासदार

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) ४ खासदार आणि इंडिअन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) या पक्षाचा एक खासदार यांनी भाजपात प्रवेश केल्याने तसेच इतर आणखी ४ खासदार ५ जुलैपर्यंत एनडीएत सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपा आणि एनडीएचे राज्यसभेत संख्याबळ वाढले असून हा आकडा बहुमताजवळ पोहोचला आहे. राज्यसभेत एकूण २४१ जागा असून एनडीए सध्या ११५ सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण बहुमतासाठी केवळ ६ खासदारांचीच आवश्यकता आहे. लोकसभेत एनडीएला बहुमत आहेत त्यानंतर राज्यसभेतही बहुमत मिळाल्यास मोदी सरकारला गेल्या वेळी राज्यसभेत प्रलंबित राहिलेली विधेयके मंजूर करुन घेता येणे शक्य होणार आहे.

रविवारपर्यंत (३० जून) सध्या २३५ सदस्य असलेल्या राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ १११ आहे. २४१ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत  १० जागा रिक्त आहेत. त्यापैकी एनडीएचे ४ खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ जुलैपर्यंत एनडीएचे संख्याबळ ११५ होणार आहे. त्यामुळे त्यांना बहुमतासाठी केवळ ६ खासदारांचीच आवश्यकता आहे. तर, राज्यसभेत संपूर्ण २४५ सदस्यांची निवड झाल्यास एनडीएला १२३ इतक्या बहुमताच्या आकड्यासाठी आणखी ८ खासदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे एनडीएने जर युपीएत सहभागी नसलेल्या टीआरएस, बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या खासदारांची मदत मिळाल्यास एनडीएची बहुमताची अडचणही दूर होऊ शकते.

दरम्यान, भाजपाच्या फ्लोअर मॅनेजर्सना आत्मविश्वास आहे की, राज्यसभेतील बहुमतासाठीची पोकळी असली तरी याची विधेयके पास करुन घ्यायला अडचण येणार नाही. यापूर्वी मोदी सरकारच्या २०१४ ते २०१९ या कार्यकाळात राज्यसभेत विरोधकांच्या बहुमतामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही सरकारला अनेक बदल करणे भाग पडले होते. याच कारणासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक अद्यापही राज्यसभेत प्रलंबित आहे. या विधेयकावर एनडीएत सहभागी असलेला जदयू सरकारसोबत नाही. त्याचबरोबर बिजद आणि वायएसआर काँग्रेसचीही तिहेरी तलाक विधेयकाबाबत आपली वेगळी मतं आहेत.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ५ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यांपैकी एका जागी भाजपाचा सहकारी पक्ष असलेल्या एलजेपीचे प्रमुख रामविलास पासवान यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर गुजरातच्या दोन जागा भाजपाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये तीन जागांवर निवडणूक होत आहे. यांपैकी एक भाजपा आणि दोन बिजदकडे जाण्याची शक्यता आहे.  तसेच १८ जुलै रोजी तामिळनाडूच्या ६ जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांवर खासदारांचा कार्यकाळ २४ जुलैला समाप्त होत आहे. सध्या अद्रमुककडे यांपैकी ४ जागा आहेत. तर द्रमुक आणि सीपीआयकडे प्रत्येकी एक जागा आहे. मात्र, यावेळी द्रमुकच्या खात्यात ३ आणि अद्रुमकच्या खात्यात ३ जागा जाण्याची आशा आहे. मात्र, तामिळनाडूतील जागा राज्यसभेतील बहुमताच्या गणितावर जास्त परिणाम करणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button