breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडलेखसंपादकीय

मिशन- २०२४ : ‘‘पेटेन पुन्हा नव्याने…हे सामर्थ्य नाशवंत नाही!’’; नाना काटे समर्थकांचे जोरदार ‘ब्रँडिंग’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा शंखनाद : वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम, फ्लेक्सबाजी जोरात

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित पवार गट) प्रभावी चेहरा आणि महापलिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे समर्थकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी २०२४ मधील विधानसभा निवडणुकीचा ‘शंखनाद’ केला आहे. किंबहुना, ‘‘पेटेन पुन्हा नव्याने…हे सामर्थ्य नाशवंत नाही!’’ या कविवर्य सुरेश भट यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे चिंचवड काबिज करण्यासाठी पुन्हा नव्याने मशागत सुरू केली आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यावेळी अजित पवार महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदावर कार्यरत होते. ही निवडणूक मार्च- २०२३ मध्ये झाली. त्यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना झाला. शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे अश्निनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी तिहेरी लढत झाली. कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम झाला. भाजपाचा फायदा झाला. त्यामुळे काटे यांना पराभव पत्कारावा लागला होता. ही सल काटे समर्थकांमध्ये आहे. त्याचे वचपा आगामी विधानसभा निवडणुकीत काढण्याचा निर्धार नाना काटेंच्या समर्थकांनी केला आहे. परिणामी, आगामी काळात भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नाना काटे यांचा वाढदिवस आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांसह नाना काटेंना वाढ दिवसाच्या शुभेच्छांचे फलक संपूर्ण मतदार संघातील मुख्य चौकांत लावण्यात आले आहेत. तसेच, विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रस्तावित असून, त्या अनुशंगाने काटे समर्थक आणि यंत्रणा कामाला लागली आहे. आगामी वर्षभरात मतदार संघातील घराघरामध्ये जावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नाना काटे यांच्या ‘‘पिंपळे सौदागर मॉडेल’’ ची जागृत करण्यात येणार आहे. त्याद्वारे केवळ विकासकामांच्या मुद्यांवर चिंचवडकरांना मतदानासाठी आवाहन करण्यात येईल, असा दावा केला जात आहे.

महाआरोग्य शिबीर अन्‌ सामाजिक उपक्रम…

नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्‍यात आले आहे . यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर 13 ऑगस्ट रोजी नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन मंगल कार्यालय, रहाटणी येथील विमल गार्डन मंगल कार्यालय तसेच तापकीर नगर काळेवाडी येथे चंद्रकांत तापकीर यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. महादेव मंदिर येथे बॉडी प्लस थेरपी , वृक्षमित्र श्री अरुण पवार यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे ११००० वृक्ष रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.पिंपळे सौदागर लिनियर गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.दि.१३ ऑगस्ट रोजी कापसे लान्स येथे उमेश काटे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आर.जे.अक्षय प्रस्तुत रजनी गंधा मराठी व हिंदी गाण्यांची मैफल आयोजित केले आहे.

चिंचवडचा भावी आमदार कोण?

चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 1,35,603, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल तथा नाना काटे यांना 99,435 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44,112 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली नसती, तर कदाचित चिंचवडमध्ये नाना काटे यांना विजय मिळाला असता. आता राज्यातील आणि शहरातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार? तसेच, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास चिंचवडच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करणार का? चिंचवडचा भावी आमदार म्हणून २०२४ मध्ये पुन्हा अश्निनी जगताप की नाना काटे आणि राहुल कलाटे यापैकी कुणाला चिंचवडकर पसंती देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button