breaking-newsराष्ट्रिय

उर्वी पाटीलने दहाव्या वर्षी सर केला “सरपास’

  • पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली

नवी दिल्ली – हिमालयातील शिवालिक रेंजमधील 13 हजार 800 फुटावरील काळाकुट्ट भोवताल, उने 8 अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्‍याच वेगाने होणारी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या विजा अशा पार्श्वभूमीवर मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणाऱ्या उर्वी अनिल पाटील या 10 वर्षाच्या मुलीने सरपास हे शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली आहे.

उर्वी म्हणाली, आमच्या सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कॅंपवरून 4 मे 2018 पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे 7 मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली.
माझ्या ट्रेकींगच्या या सर्व कॅंपमध्ये नगारु ते बिस्करी या कॅंपदरम्यान सरपास हे 13 हजार 800 फुटांवरील शिखर आहे. हे शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे 14 कि.मी.चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे 2 वाजता होते. मात्र, याच वेळेस वातावरण अचानक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले.

अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कॅंप लीडर यांनी दिल्याने पुन्हा पहाटे 3.15 वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. 200 मीटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. 14 मे 2018ला पठारावर पोहोचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता. माझ्यासारख्या लहानग्या मुलीसाठी ही खूप मोठी उपलब्धीही होती, असे तिने सांगितले.

अशी केली तयारी 
हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिकदृष्ट्‌या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड व सुका मेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्‍याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टिकही खरेदी केली, त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने आत्मविश्वासाने सांगितले.

सरपास हे अत्यंत अवघड शिखर सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. आता जगातील सर्वात अवघड एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एव्हरेस्ट बेस कॅंप करण्याचे माझे ध्येय आहे.
– उर्वी पाटील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button