उन्नाव बलात्कार प्रकरण ; भाजप आमदाराला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने केलेले आरोप योग्य असल्याची पुष्टी सीबीआयने केली आहे. आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला वाचवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी प्रयत्न केला असल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे.
भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित युवतीने केला होता. या आरोपानंतर मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेश सरकारवर टीका सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने ‘सीआरपीसी’ कलम १६४ अंतर्गत कोर्टासमोर पीडितेचा जबाब नोंदवला. बलात्काराची घटना झाल्यानंतर पीडितेने आरोपींमध्ये आमदाराचे नाव घेतले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी २० जून रोजी दाखल केलेल्या एफआरआयमधून आमदार आणि अन्य आरोपींची नावे वगळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पीडित युवतीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर केला होता. तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी आवश्यक नमुने पाठवले नाहीत. हे सर्व आरोपींना वाचवण्यासाठी करण्यात आले असल्याचे दिसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.