breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उंदीर खाऊन जगणाऱ्या मुसाहर समाजावर उपासमारीची वेळ

दिल्ली – उत्तर प्रदेश सरकार सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा करत असताना १४ सप्टेंबरला सोनवा देवीच्या दोन मुलांचा आजार आणि उपासमारीने मृत्यू झाला. सोनवा देवी यांच्या प्रमाणेच रकबा दुलमा पट्टी गावातील विरेंद्र मुसाहर यांचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. विरेंद्र यांची पत्नी संगीता (३०) त्यांचा सहावर्षांचा मुलगा शाम यांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू प्रामुख्याने उपासमारीने झाले आहेत.

सोनवा देवी, विरेंद्र हे दोघेही मुसाहर समाजातील आहेत. महादलितांमध्ये मोडणाऱ्या मुसाहर समाजातील लोकांचे मुख्य अन्न उंदीर आहे. काही वेळेस गोगलगाय खाऊनही हे लोक दिवस ढकलतात. उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकाऱ्यांच्या मते हे मृत्यू उपासमारीने झालेले नाहीत. दोन मुलांच्या मृत्यूनंतर सोनवी देवीच्या घरी प्रशासनाकडून धान्य पोहोचवण्यात आले. ते पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी उसळली होती. सोनवी देवीच्या घरी धान्य पोहोचले ती किती भाग्यवान आहे अशी चर्चा त्या गर्दीमध्ये सुरु होती.

मुसाहर समाज बऱ्याच काळापासून उपासमारीचा सामना करतोय. उत्तर प्रदेश सरकारच्या मते विरेंद्रची पत्नी संगीता आणि तिच्या मुलांचा डायरीयाने मृत्यू झाला त्याचा उपासमारीशी काहीही संबंध नाहीय. सोनवा देवीच्या दोन्ही मुलांचा ह्दयरोग आणि टीबीमुळे मृत्यू झाला असे खुशीनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हरीचरण सिंह यांनी सांगितले. दुसरे अधिकारी राकेश कुमार यांनी वैद्यकीय चाचण्यांमध्ये दोन्ही मुलांना टीबी नसल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. पण ही बाब उघड करु नये यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा दबाव होता असे सांगितले. मुसाहर समाज आणि सरकारकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत असले तरी उंदीर आणि गोगलगायीवर उपजिवीका करणारा हा समाज सध्या उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button