breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आशियातील पहिले ‘अभेद्य’ प्रशिक्षण केंद्र ‘आयएनएस शिवाजी’वर

युद्धनौकेवर कोणत्याही प्रकारचा आण्विक, जैविक किंवा रासायनिक हल्ला झाला असता अशा आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करायचे याचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी ‘अभेद्य’ हे ‘न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल अ‍ॅण्ड केमिकल ट्रेनिंग फॅसिलिटी’ प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आशियातील या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा भारताच्या तीनही सैन्य दलांना लाभ होईल, असे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सोमवारी सांगितले.

लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे सुरु करण्यात आलेल्या आशियातील पहिल्या ‘एनबीसीएफटी’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अ‍ॅडमिरल लांबा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी आयएनएस शिवाजीचे कमांडंट श्रीनिवास उपस्थित होते. नौदल सेवेत दाखल होणाऱ्या सर्व अधिकारी आणि जवानांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होणार आहे. घेतलेले प्रशिक्षण अद्ययावत करण्याची सुविधा देखील या केंद्रात उपलब्ध होणार आहे.

आण्विक, जैविक किंवा रासायनिक हल्ला झाला असता त्याच्या गंभीर दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी आयएनएस शिवाजी येथे अभेद्य या अत्याधुनिक जहाजाची निर्मिती करण्यात आली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने या जहाजाची निर्मिती केली असून ते संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. आशिया खंडातील अशा प्रकारचे हे पहिले प्रशिक्षण केंद्र असून येथून पुढच्या काळात सर्व युद्धनौकांवर ही यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे.

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा म्हणाले, आयएनएस शिवाजी येथील प्रशिक्षण केंद्रावर प्राथमिक ते अत्याधुनिक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेशी संबंधित आण्विक, रासायनिक आणि जैविक प्रशिक्षण केंद्र ही व्यवस्था विशेष करून युद्धनौकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण, रासायनिक हल्ला झाला असता त्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकाचा शोध घेणे आणि योग्य ती मदत पुरवणे याबाबतचे प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे.  सागरी सुरक्षा मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अत्याधुनिक युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा आणि प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय नौदलाची महत्त्वाची आणि अ वर्ग प्रशिक्षण संस्था असलेल्या आयएनएस शिवाजी या संस्थेची स्थापना १९४५ मध्ये झाली असून संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button