breaking-newsपिंपरी / चिंचवड

आमदार अण्णा बनसोडे यांनी जनतेला तीन महिन्याचे धान्य मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत – अमोल थोरात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च रोजी रात्री ९ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला दिशाभूल म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपण कोण आहोत हे शहरातील जनतेसमोर सिद्ध केले आहे, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी टिका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून गोरगरीब व गरजू लोकांचे पोट भरता येणार नाही. मोदी सरकारने नागरिकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य देण्यासाठी राज्य सरकारकडे विनाअट धान्याचा साठा सोपविला आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी हे धान्य विनाअट जनतेला कसे मिळेल यासाठी घराबाहेर पडून जरा प्रयत्न करावेत, असा सल्लाही थोरात यांनी दिला आहे.

भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “संपूर्ण देश कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात बसून लढा देत आहे. बाहेर डॉक्टर, रुग्णालयांमधील कर्मचारी, पोलिस तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना विरोधात जीवावर उदार होऊन लढा देत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. जगातील बहुतांश देशांनी हा पर्याय निवडलेला आहे. आपल्या देशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. गेल्या १०-१२ दिवसांपासून देशातील सर्व लोक घरातच राहून लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद देत आहेत. काही अपवादाच्या घटना सोडल्या तर लॉकडाऊनमध्ये घरी राहून देशातील सर्व नागरिक एक प्रकारे देशसेवाच करत आहेत. घरातच राहिल्याने देशवासीयांचे मनोबल खचू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळे आवाहन करत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी टाळ्या किंवा थाळी वाजवून देशवासीयांचा उत्साह वाढविला. आता त्यांनी ५ मार्च रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवा किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावण्याचे देशवायीसांना आवाहन केले आहे. हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना कळकळीची विनंती केली आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपली तेवढी उंची नसतानाही टीका करून प्रसिद्धी मिळविली आहे. “हर हर महादेव” ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही माहित होते. “चले जाव”ची घोषणा देऊन इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधी यांनाही माहित होते. देशवासीयांकडे रक्त मागून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे सुभाषचंद्र बोस यांनाही माहित होते. त्याच पद्धतीने दिवे लावून, टाळ्या वाजवून देशाला पडलेला कोरोनाचा विळखा जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांननाही माहित आहे. मात्र अशा सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते असे रामदास स्वामी यांनी म्हटले आहे. मात्र ज्यांना हे समजत नाही त्यांना रामदास स्वामी यांनी पढतमूर्ख म्हटले आहे. त्यामुळे मोदी यांच्या आवाहनावर टीका करून राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपण कोण आहोत हे जनतेसमोर सिद्ध केले आहे.

देशावर संकट आलेले असताना आपण सर्व एक आहोत हे दाखविण्याची अपेक्षा असते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते हे आमदार अण्णा बनसोडे यांनी दाखवून दिले आहे. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा आमदार अण्णा बनसोडे हे शहरातील गोरगरीब, कष्टकरी आणि गरजू जनतेला दोन वेळचे जेवण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसले असते तर शहरातील जनतेने त्यांना गांभीर्याने घेतले असते. परंतु, काही तरी करून प्रसिद्धीझोतात येण्यासाठी आमदार बनसोडे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर टिका करून जनतेपुढे स्वतःचेच हसू करून घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांचे मनोबल वाढविण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाला तीन महिन्याचे मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारने राबवायची आहे. त्यासाठी धान्याचा ९० टक्के कोटा राज्य सरकारच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. हे धान्य देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. मात्र राज्य सरकारने जाचक अटी घालून नागरिकांना मोफत धान्यापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान रचलेले आहे. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या सरकारसोबत भांडून या जाचक अटी रद्द करण्यास भाग पाडावे. समाजाच्या शेवटच्या घटकातील कुटुंबापर्यंत मोफत धान्य कसे पोहोचेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून गोरगरीबांचे पोट भरणार नाही, असा सल्लाही त्यांनी आमदार बनसोडे यांना दिला आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button