breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आनंद, उत्साहाबरोबरच साशंकताही..

मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाल्याची आंदोलनकर्त्यांची भावना

स्थळ – आझाद मैदान. वेळ – दुपारी १.३०ची. मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आणि आठवडाभर मराठा संवाद मोर्चाच्या तंबूत ठाण मांडून बसलेल्या मराठी क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट पसरली. मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांच्या ‘एक मराठा- लाख मराठा’, ‘जय जिजाऊ-जय शिवराय्’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं- नाही कुणाच्या बापाचं’, ‘तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ – जय शिवराय’, अशा घोषणांनी हे मैदान दणाणून गेले. आतापर्यंत काढलेल्या ५८ मराठा मोर्चाचे सार्थक झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. ‘सरकारने आरक्षण मंजूर करून उपकार केले नाहीत. तो आमचा हक्कच होता, असे येथील कार्यकर्ते ठणाणून सांगत होते. मुंबई जिंकली आहे. आता दिल्ली जिंकायची आहे, या एका कार्यकर्त्यांच्या वाक्यावर चांगलाच जल्लोष झाला. आरक्षणाच्या लढय़ात बलिदान देणाऱ्या समाज बांधवाना यावेळी शांत उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

अनेक कार्यकर्त्यांनी मोजके कपडे, खाण्यासाठी कोरडा फराळ अशी शिदोरी घेऊन मुंबई गाठली होती. सुजाता पवार ही कार्यकर्ती आपल्या तान्हुल्याला घेऊन आठवडाभर शक्य नाही म्हणून आजच्या दिवसापुरती जालन्याहून मुंबईला आली होती. तिच्यासारख्या अशाच काही स्त्रिया आणि महाविद्यालयान तरुण-तरुणी यावेळी आवर्जून उपस्थित होते. कायद्याच्या कचाटय़ात आरक्षण अडकायला नको, अशी भावना त्यांच्यात होती.

शेतक ऱ्यांच्या मुलांनी शेतकरीच रहायचे का? त्यांच्यासाठी आरक्षण मिळणे गरजेचे होते, अशी भावना रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातून आलेल्या संतोष पार्टे यांनी व्यक्त केली. राजेंद्र श्रीरंग गायकवाड हे साताऱ्यातील शेतकरी. त्यांच्यासोबत साताऱ्यातील काही शेतकरी कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल झाले होते. शेतीची कामे अध्र्यावर टाकून त्यांनी मुंबई गाठली होती. आमच्या साताऱ्याला शेती आमचा मुख्य व्यवसाय. पण निसर्गाचा लहरीपणा आणि दुष्काळाचे संकट त्यामुळे शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. अशावेळी आरक्षण मिळाल्यास मुले तरी त्यांच्या पायावर उभी राहू शकतील. यासाठी आरक्षण हवेच होते, असे त्यांचे म्हणणे होते.

छाया इंदुलकर आणि प्रणाली इंदुलकर मराठा क्रांती मोर्चात वर्षभर काम करत होत्या. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या पुढच्या पिढीसाठीचा संघर्ष पाहून या मोर्चासाठी वेळ देण्याचे आम्ही दोघींनी ठरवले, असे त्या म्हणाल्या.

नेत्यांची धाव

मराठा आरक्षण मंजूर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार, जयंत पवार, भाई जगताप आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे अशा अनेकांनी आझाद मैदानाकडे धाव घेतली. अजित पवारांनी यांनी मराठा समाजाच्या संघटनेत कुठेही फूट पडू देऊ नका, एकोप्याने रहा, असा सल्ला दिला. हा कुठल्याही पक्षाचा विजय नसून सकल मराठा समाजाचा विजय आहे, असे जगताप म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button