breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गावोगावच्या शैक्षणिक प्रयोगशीलतेची ‘शिक्षणाची वारी’

मुंबईतील जत्रेचा आज समारोप

टाकाऊ वस्तूंपासून १२५ वैज्ञानिक प्रयोग, भित्तीचित्रे, रंगीत फुले-पाने, फ्लॅशकार्ड्स यांच्या माध्यमातून संस्कृत अध्ययन सोपे कसे करायचे, गोटय़ा, आईस्क्रीमच्या काठय़ा इत्यादी वस्तूंच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना गणित कसे शिकवावे, चलचित्रांच्या माध्यमातून भौगोलिक संकल्पना कशा स्पष्ट करायच्या याचे दर्शन मुंबईत पहिल्यांदाच आयोजिण्यात आलेल्या ‘शिक्षणाच्या वारी’च्या निमित्ताने मुंबईकरांना घडते आहे.

प्रयोगशील शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये राबवलेले कृतिशील उपक्रम शाळांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यात विविध ठिकाणी शिक्षणाची वारी आयोजित करण्यात आली आहे. त्याची सुरुवात बुधवारी वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानात करण्यात आली. ३० नोव्हेंबरला या वारीचा समारोप होईल. या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांनी आपण पालकांच्या सहभागातून शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले आहेत.

‘डीआयसीपीडी’ अमरावतीच्या टीमने ‘झिरो बजेट विज्ञान प्रयोग व प्रयोगशाळा’ कशी निर्माण करावी हे सांगणारा स्टॉल लावला होता. यात टाकाऊ वस्तूंपासून १२५ वैज्ञानिक प्रयोग करुन दाखवण्यात आले. स्वराली लिंबकर, पुष्पलता मुळे, रामराव पवार यांनी सिग्नल तसेच रेल्वे पुलाखाली राहणाऱ्या शाळाबाह्य़ मुलांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारा स्टॉलही इथे होता. जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ सुबिर शुक्ला यांनी विकसित के लेल्या ‘एक्स्पिरिअन्स रिफ्लेक्शन अ‍ॅप्लिकेशन कन्सोलिडेशन’ तंत्राच्या सहाय्याने महाराष्ट्राने स्वत:चे मोडय़ुल तयार के ले असून यातून ६० हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. याबाबत माहिती देणारा स्टॉल इथे होता. भित्तीचित्रे, रंगीत फुले-पाने, फ्लॅशकार्ड्स यांच्या माध्यमातून संस्कृत कसे शिकवावे याची माहिती देणारा स्टॉल ‘महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान’च्यावतीने लावण्यात आला होता.

‘प्रत्येक मुलाला अभ्यासात रस असेलच असे नाही. त्यांच्या आवडीचे खेळ, कला त्यांना शिकवल्या तर विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ वाटेल. म्हणूनच आम्ही पालकांच्या सहभागातून जलतरण, कराटे, योग इत्यादींचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो,’ असे निगुंडळ त्रिभुवनवाडी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक अश्विन वाघमारे यांनी सांगितले. लैंगिक शिक्षण, इंग्रजी भाषेचे शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण यासाठी शिक्षकांनी विविध रंगीत तक्ते तयार केले होते. या माध्यमातून शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. शिक्षणाच्या वारीचे हे चौथे वर्ष असून मुंबई, ठाण्यासह कोल्हापूर, वर्धा, नांदेड, आणि जळगाव येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाठय़पुस्तकांचा प्रवास

शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके काळानुरूप कशी बदलत गेली आहेत हे दाखवण्यासाठी जुन्या काळातील पुस्तकांपासून आतापर्यंतची पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. सध्या शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये रंगीत चित्रे तसेच कृती आधारित शिक्षण आहे. त्यामुळे पुस्तके अधिक बोलकी कशी होतात, हे यातून दिसून येते. पूर्वी शाळांमध्ये कार्यानुभव विषयाचा विशिष्ट अभ्यासक्रम नव्हता. पण या वर्षीपासून पहिली इयत्तेला कार्यानुभव विषयाचे पुस्तक देण्यात येणार आहे. हे पुस्तक येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व

सातारा येथील विखाळे शाळेने गावातील लोकांच्या सहभागातून शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून आतापर्यंत ४१ लाख रुपयांचा शैक्षणिक निधी जमा करण्यात आला आहे. शाळेच्या भौतिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून देण्यासाठी विखाळे शाळेचे शिक्षक अमोल गुरव यांनी स्टॉल लावला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button